जांभूळघाट आश्रमशाळा प्रकरणात शिक्षकांवरही कारवाईची मागणी; आदिवासी टायगर सेना आक्रमक
लिलाधर पिसे व चंद्रशेखर बोरकर यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून बडतर्फ करण्याची मागणी; प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत उपआयुक्तांना निवेदन
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळा येथील विद्यार्थ्यांच्या केस कापण्याच्या आणि त्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाल्याच्या कथित प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणात केवळ अधीक्षक व मुख्याध्यापक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून संबंधित शिक्षकांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करीत आदिवासी टायगर सेनेने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या प्रकरणातील लिलाधर पिसे, माध्यमिक शिक्षक आणि चंद्रशेखर बोरकर, शिक्षक यांच्यावरही चौकशी करून कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून बडतर्फीची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी टायगर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
आदिवासी टायगर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर यांच्या माध्यमातून आयुपी सिंग, उपआयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांना यासंदर्भात निवेदन साद केले. या निवेदनातून जांभूळघाट आश्रमशाळेतील संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर समान पद्धतीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचा आरोप
जांभूळघाट येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे केस कापण्यात आल्याचा आरोप यापूर्वी समोर आला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांचे फोटो काढून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या मान-सन्मानाला धक्का पोहोचला असून त्यांची बदनामी व विटंबना झाल्याचा आरोप आदिवासी टायगर सेनेने केला आहे.
या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही विद्यार्थ्यांना शाळा सोडण्यास भाग पाडले गेल्याचेही संघटनेने निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ शाळेतील शिस्तीचा विषय नसून विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकार, प्रतिष्ठा आणि सामाजिक सन्मानाशी संबंधित गंभीर बाब असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
‘फक्त अधीक्षक आणि मुख्याध्यापकांवरच कारवाई का?’
या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाने अधीक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र, कथित घटनेमध्ये इतर संबंधितांची भूमिका काय होती, याची सखोल चौकशी झाली का? संबंधित शिक्षकांवर कारवाई का करण्यात आली नाही? असा थेट सवाल आदिवासी टायगर सेनेने उपस्थित केला आहे.
दोषी कोणताही असो, त्याच्यावर समान निकषाने कारवाई झाली पाहिजे. केवळ दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करून प्रकरण संपविण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
लिलाधर पिसे व चंद्रशेखर बोरकर या शिक्षकांची या संपूर्ण प्रकरणातील भूमिका तपासून त्यांच्यावरही कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. विद्यार्थ्यांशी संबंधित प्रकरण असल्याने प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाईची मागणी
आदिवासी विद्यार्थ्यांशी संबंधित असल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आदिवासी टायगर सेनेने केली आहे. दोष सिद्ध झाल्यास संबंधितांवर सेवेतून बडतर्फ करण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.
संघटनेच्या मते, आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणाऱ्या कोणत्याही प्रकाराकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. या घटनेतील सर्व संबंधितांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई झाल्याशिवाय आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही, अशी भूमिका संघटनेने मांडली.
पत्रकार परिषदेत प्रशासनाला गंभीर इशारा
या मागण्यांसंदर्भात आदिवासी टायगर सेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जांभूळघाट आश्रमशाळा प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित सर्वांवर समान पद्धतीने कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी विदर्भ राज्य कार्याध्यक्ष माधुरी मडावी, विदर्भ राज्य अध्यक्ष संतोष कुळमेथे, महिला सदस्य पुष्पा कुमरे, महिला सदस्य संगिता येरकाडे, विदर्भ सल्लागार दशरथ कुळमेथे, शालिनी पेंदाम, रिता गोवर्धन, कविता उराडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आता या निवेदनाची प्रशासनाकडून काय दखल घेतली जाते आणि संबंधित शिक्षकांवर चौकशी अथवा गुन्हा दाखल करण्याबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आदिवासी समाजासह पालकांचे लक्ष लागले आहे. जांभूळघाट आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि दोषी आढळणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.मागण्या मान्य न झाल्यास ATC कार्यालय नागपूर तसेच प्रोजेक्ट ऑफिस चिमूर समोर बेमुदत आंदोलन केले जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!