पुनर्वसन जामणीत जुगाराचे अड्डे राजरोस? पोलिसांच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष

लाखोंच्या पैशांवर पत्त्यांचा डाव; जुगारामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत, खडसंगीपासून जवळच असलेल्या पुनर्वसन जामणी गावात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. गावातील काही ठिकाणी खुलेआम जुगाराचे अड्डे सुरू असल्याची चर्चा असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जामणी येथे पत्त्यांवर मोठ्या रकमेची पैज लावून जुगार खेळला जात असल्याचे सांगितले जात आहे. लाखो रुपयांच्या उलाढालीचा जुगार सुरू असल्याचा दावा नागरिकांकडून केला जात असून, या प्रकारामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे.
जुगाराच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाले आणि आर्थिक अडचणी वाढल्या, असा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. विशेषतः तरुणांमध्ये जुगाराचे आकर्षण वाढल्यास त्याचे सामाजिक परिणाम गंभीर होऊ शकतात, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याची चर्चा असतानाही संबंधित पोलिसांकडून ठोस कारवाई का होत नाही, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना आहे की नाही? माहिती असल्यास अद्याप कारवाई का झाली नाही? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, जामणी परिसरातील कथित जुगार अड्ड्यांवर शेगाव पोलिसांनी तातडीने लक्ष देऊन वस्तुनिष्ठ चौकशी करावी आणि जुगार सुरू असल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

या आरोपांची अधिकृत पुष्टी पोलिसांकडून झालेली नसून, पोलिसांची बाजू समोर आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!