ई-पीक पाहणीची मुदत संपली; अपूर्ण नोंदणीमुळे शेतकऱ्यांची चिंता
ई-पीक पाहणीची अंतिम मुदत संपली; अपूर्ण नोंदणीमुळे शेतकऱ्यांची चिंता
ई-पीक पाहणीसाठी मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी
सावली : खरीप हंगामातील ई-पीक पाहणीची शेतकरी स्तरावरील मुदत ३० सप्टेंबर रोजी संपत असताना अनेक शेतकऱ्यांना अद्याप ई-पीक पाहणीची नोंद करता आलेली नसल्याने चिंता वाढली आहे. ई-पीक पाहणीची नोंद वेळेत न झाल्यास शासनाच्या विविध सवलती व मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांकडून शेतकरी नोंदणी करणारी अँपची तांत्रिक अडचण दूर करुन मुदत वाढवून देण्याची मागणी होत आहे.
सावली तालुक्यासह परिसरात पावसाचे प्रमाण, पिकांची परिस्थिती आणि संभाव्य नुकसान यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलती व मदतीसाठी पीक नोंदणी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे ई-पीक पाहणी पूर्ण न झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना लाभ मिळण्यात अडचणी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शेतकरी लॉगिनचे अॅप व्यवस्थित चालत नसल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. अॅपमध्ये तांत्रिक अडचणी, सर्व्हरची समस्या तसेच नोंदणी करताना येणाऱ्या अडथळ्यांमुळे वेळेत पीक पाहणी करता आली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, ई-पीक पाहणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सहाय्यकांना मोबदला मिळण्याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. मोबदला व तांत्रिक अडचणींमुळे सहाय्यक स्तरावरील कामात अपेक्षित गती नसल्याची चर्चा आहे. ई-पीक पाहणीची प्रक्रिया ही केवळ ऑनलाइन नोंदणीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांशी संबंधित असल्याने प्रशासनाने शेतकरी अँपं मधील तांत्रिक अडचणी दूर करून ई-पीक पाहणीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. मुदतवाढ मिळाल्यास अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आपली पीक नोंद पूर्ण करण्याची संधी मिळणार असून, दुष्काळी परिस्थितीत शासनाच्या मदतीपासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!