दुचाकीस्वार पडताच काही क्षणांतच एसटी आल्याने दुर्दैवी अपघात चाकाखाली आल्याने एकाचा जागीच मृत्यू; एक जखमी
तळोधी-बाळापूर : दुचाकीस्वाराचा अचानक तोल जाऊन तो रस्त्यावर पडला आणि त्याचवेळी काही क्षणांतच एसटी बस तेथे येऊन धडकल्याने दुर्दैवी अपघात घडला. एसटीच्या मागील चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला एक जण जखमी झाला. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास सोनोली बुद्रुक गावाजवळील जंगल परिसरात घडली.
या अपघातात दीपक विठोबा चनफणे (वय ४२, रा. मंगरूळ) यांचा मृत्यू झाला असून नरेश प्रभू कोहळे (वय ३२, रा. मंगरूळ) हे जखमी झाले आहेत.
दीपक चनफणे व नरेश कोहळे हे दोघेही तळोधी-बाळापूर येथे खाजगी कामानिमित्त आले होते. काम आटोपून ते दुचाकी क्रमांक MH-BQ-4124 ने मंगरूळकडे परत जात होते. सोनोली बुद्रुकजवळील जंगल परिसरात मांगुर्डे येथील एका मित्राला भेटण्यासाठी ते रस्त्यावर थांबले होते. त्याचवेळी अचानक दुचाकीचा तोल गेल्याने दोघेही रस्त्यावर पडले.
दुचाकीस्वार रस्त्यावर पडण्याची घटना घडताच अवघ्या काही क्षणांतच चिमूर–तळोधी मार्गावरून एसटी बस क्रमांक MH-07-C-9477 तेथे आली. रस्त्यावर अचानक व्यक्ती पडल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र दीपक चनफणे हे रस्त्याच्या उजव्या बाजूला पडल्याने एसटीच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अवघ्या काही क्षणांत घडलेल्या या अनुचित घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीड येथे पाठविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!