करोली-आकापूर परिसरात हत्तींचे आगमन - वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
सावली : गडचिरोली ते सावली असा वैनगंगा नदीमार्गे हत्तींच्या कळपाचा सुरू असलेला प्रवास पुन्हा एकदा सावली तालुक्यात पोहोचला आहे. करोली, आकापूर आणि गेवरा परिसरात जंगली हत्तींचा कळप दाखल झाल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थितीची दखल घेत वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोली आणि सावली तालुक्याच्या परिसरात वैनगंगा नदी पार करून हत्तींचे कळप ये-जा करत आहेत. सुमारे तीन महिन्यांपूर्वी तब्बल ३२ हत्तींचा कळप महिनाभर सावली तालुक्यात वावरला होता. त्यावेळी हत्तीच्या हल्ल्यात सोनापूर येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तसेच हत्तींच्या संचारामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
आता पुन्हा हत्तींच्या कळपाने सावली तालुक्यात शिरकाव केल्याने शेतकरी, शेतमजूर आणि परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हत्तींचा कळप कोणत्या दिशेने पुढे सरकतो, यावर वनविभागाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
सावधानतेचा इशारा
करोली, आकापूर आणि गेवरा परिसरात जंगली हत्तींचा कळप आढळून आल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. हत्ती दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करू नये. हत्तींच्या हालचालींची माहिती तात्काळ जवळच्या वनकर्मचाऱ्यांना किंवा वनविभागाला द्यावी. वनविभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःच्या तसेच इतरांच्या जीविताची काळजी घ्यावी. हत्तींच्या संचाराच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अनावश्यकपणे जाणे टाळावे आणि वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. विनोद धुर्वे यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!