शिवार हाट बाजारात भाजी विक्रेत्यांमध्ये तुफान राडा; चाकूने वार करत दोघा भावांना केले गंभीर जखमी

दुकानांच्या ओट्यांची अपुरी व्यवस्था कारणीभूत? नगरपरिषदेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह; घटनेने चिमूर शहरात खळबळ

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात येत असलेल्या चिमूर नगर परिषदेने शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात नव्याने सुरू केलेल्या शिवार हाट बाजारात दिनांक. २० सप्टेंबर २०२६ रोजी रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास भाजी विक्रीच्या कारणावरून दोन गटांतील भाजी विक्रेत्यांमध्ये वाद विवाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन भाजी कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चाकूने सपासप वार केल्याने दोघे सख्खे भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे शिवार हाट बाजार परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेत (१) गणेश देवराव लोथे भाजप चे बूथ अध्यक्ष (वय ३५ वर्षे ) आणि (२) नितेश देवराव लोथे (वय ३२ वर्षे ) हे दोघे भाऊ जखमी झाले आहेत. वाद शांत झाल्यानंतर दोन्ही जखमींनी रक्त बंभाळ अवस्थेतच दुचाकीने तातडीने चिमूर पोलीस ठाणे गाठून संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे आरोपी कमांक.(१) प्रज्वल महेश रासेकर (वय २२ वर्षे ) आणि (२) दिपक केशव साखरकर (वय ३० वर्षे ) यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी जखमींना प्रथमोपचारासाठी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे दाखल केले. उपचारादरम्यान नितेश लोथे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आल्यानंतर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले.
घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिमूर पोलीस करीत आहेत.

ओट्यांची संख्या अपुरी असल्याचा नागरिकांचा आरोप

दरम्यान, शिवार हाट बाजारातील भाजी विक्रेत्यांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. बाजारात भाजी विक्रेत्यांची संख्या मोठी असताना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले दुकानांचे ओटे हे अपुरे असल्याने जागेवरून भाजी विक्रेत्यांचे अनेकदा नगर परिषद कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

भाजी विक्रेत्यांची संख्या, उपलब्ध जागा आणि दैनंदिन भरणारी गुजरीचे नियोजन यांचा योग्य समन्वय न झाल्यास भविष्यात अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने शिवार हाट बाजारातील जागा, ओटे, विक्रेत्यांचे नियोजन आणि सुरक्षाव्यवस्थेबाबत तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मात्र, या चाकूहल्ल्याच्या घटनेला नगर परिषदेचे मुख्याधिकारी थेट जबाबदार असल्याचे अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेले नाही. बाजारातील व्यवस्थापनाबाबत प्रशासनाची नेमकी जबाबदारी आणि घटनेची कारणे याबाबत पोलिस तपास व संबंधित प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!