मूल–नागपूर बससेवेसाठी भाजप शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले आक्रमक

मूल–नागपूर बससेवेसाठी भाजप शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले आक्रमक

आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवारांकडे निवेदन; एसटी सेवा सुरू करण्याची मागणी



मूल : मूल शहर व तालुक्यातील नागरिकांची वाढती गरज लक्षात घेता मूल–नागपूर थेट एसटी बससेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे मूल शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले यांनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मूल–नागपूर मार्गावर सध्या थेट व सोयीची एसटी सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी, रुग्ण तसेच विविध कामांसाठी नागपूरला जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

मूल हे तालुक्याचे प्रमुख ठिकाण असून नागपूरशी असलेली दैनंदिन प्रवासाची गरज मोठी आहे. मात्र थेट बससेवा नसल्यामुळे नागरिकांना चंद्रपूर अथवा अन्य मार्गाने नागपूर गाठावे लागत असून, त्यासाठी वेळ आणि आर्थिक खर्च दोन्ही वाढत असल्याचे मोहुर्ले यांनी म्हटले आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, रुग्णांना उपचारासाठी आणि नागरिकांना शासकीय कामांसाठी नागपूरला नियमित जावे लागते, त्यामुळे थेट बससेवेची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एसटीच्या विविध सवलतींचा लाभ महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना मिळतो. मात्र मूल–नागपूर मार्गावर एसटी बस उपलब्ध नसल्यामुळे या प्रवाशांना सवलतीच्या प्रवासापासून वंचित राहावे लागत असून, त्यांना खासगी ट्रॅव्हल्सचा तुलनेने महागडा पर्याय स्वीकारावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे पाठपुरावा करून मूल–नागपूर थेट बससेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी मोहुर्ले यांनी केली आहे. त्यांच्या प्रस्तावानुसार मूलहून सकाळी ७ वाजता आणि दुपारी २ वाजता, तर नागपूरहून सकाळी ७ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता बसफेऱ्या सुरू करण्याचे सुचविण्यात आले आहे.

मूल–नागपूर बससेवा ही केवळ प्रवासाची सुविधा नसून शिक्षण, आरोग्य, रोजगार, व्यापार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी जोडलेली बाब आहे, असे मोहुर्ले यांनी निवेदनातून अधोरेखित केले आहे. त्यामुळे या मागणीची दखल घेऊन आमदार मुनगंटीवार यांनी एसटी महामंडळाकडे पाठपुरावा केल्यास मूलकरांना मोठा दिलासा मिळू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, मूल–नागपूर थेट बससेवा सुरू करण्याच्या मागणीवर आमदार मुनगंटीवार आणि एसटी महामंडळाची पुढील भूमिका काय राहणार, याकडे आता मूल शहर व तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!