खडसंगीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात निर्णायक लढ्याचा इशारा; आमदार विजय वडेट्टीवार यांची बेमुदत धरणे आंदोलनाला भेट
१५ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल; लोकलेखा समितीमार्फत चौकशीसाठी पत्र देण्याची ग्वाही
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील खडसंगी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार व कारभारातील अनियमिततेविरोधात ग्रामस्थांकडून ४ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला काँग्रेसचे विधिमंडळ नेते तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी १८ सप्टेंबर रोजी भेट देत आंदोलनकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
खडसंगी ग्रामस्थांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या १५ दिवसांपासून हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारातील कथित अनियमितता, विकासकामांमधील गैरप्रकार तसेच कामे न करता बिले काढल्याच्या आरोपांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या व तक्रारी जाणून घेतल्या. “कुठलेही काम झाले नसताना बोगस बिले काढली जात असतील, तर हा केवळ भ्रष्टाचाराचा विषय नसून जनतेच्या पैशांचा गैरवापर आहे. गेल्या १५ दिवसांपासून आंदोलन सुरू असतानाही प्रशासनाने याची योग्य दखल घेतली नसेल, तर आता प्रशासनाला जाब विचारला जाईल,” असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणाची लोकलेखा समितीमार्फत तपासणी करण्यात यावी, यासाठी संबंधित सचिवांना पत्र देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आगामी हिवाळी अधिवेशनातही खडसंगी ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकाराचा प्रश्न उपस्थित करून तो लावून धरण्याची ग्वाही त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिली.
“जनतेच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल. भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांनी सुरू केलेले हे आंदोलन वाया जाऊ देणार नाही. संबंधित प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी होण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल,” असे आमदार वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमदारांच्या भेटीमुळे आंदोलनकर्त्यांना बळ मिळाले असून, ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!