नलिनी आडपवारांची मागणी : मूलमध्ये थकीत मालमत्ता व पाणी करावरील व्याज-शास्ती माफ करा!
थकीत मालमत्ता व पाणी कर वसुलीसाठी व्याज-शास्ती माफीची मागणी
नगर परिषद मूलकडे महिला व बालकल्याण समिती सभापतींची मागणी
मूल : नगर परिषद मूल हद्दीतील अनेक मालमत्ताधारकांकडे मागील अनेक वर्षांपासून मालमत्ता कर व पाणी कराची थकबाकी आहे. ही थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांना दिलासा देतानाच नगर परिषदेची थकीत कर वसुली प्रभावीपणे करण्यासाठी व्याज व शास्ती माफ करून अभय योजना राबवावी, अशी मागणी नगर परिषद मूलच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. नलिनी दिनेश आडपवार यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
यासंदर्भात त्यांनी १८ सप्टेंबर २०२६ रोजी मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या १४ मे २०२५ रोजीच्या शासन निर्णयाचा संदर्भ देण्यात आला आहे.
निवेदनानुसार, नगर परिषद मूल क्षेत्रातील मालमत्ता व पाणी करधारकांकडे बऱ्याच वर्षांपासून कराची थकबाकी असून त्यावर व्याज व शास्तीची रक्कमही वाढत आहे. त्यामुळे थकीत करधारकांकडून एकरकमी थकीत कर वसूल करण्यासाठी शासनाची अभय योजना राबवून संपूर्ण व्याज व शास्ती माफ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या योजनेमुळे अनेक वर्षांपासून कर थकीत असलेल्या नागरिकांना कर भरण्याची संधी मिळू शकते आणि नगर परिषदेलाही मोठ्या प्रमाणात थकीत कराची वसुली करता येऊ शकते, असा मुद्दा निवेदनातून मांडण्यात आला आहे.
“थकीत कराची रक्कम एकरकमी वसूल होण्यासाठी शासनाची अभय योजना राबवून थकीत वसुलीस प्रोत्साहन द्यावे,” अशी मागणी सौ. आडपवार यांनी केली आहे.
निवेदनाच्या प्रती नगराध्यक्ष व उपाध्यक्ष, नगर परिषद मूल यांनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नगर परिषद प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे करदाते आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!