‘मी राजा आहे!’ म्हणत ग्रामसेवकाचा BDO च्या दालनात राडा!

मद्यधुंद अवस्थेत अश्लील शिवीगाळ; ‘ ॲट्रॉसिटी लावीन’ची धमकी | शासकीय कामात अडथळा; वरोरा पोलिसांत गुन्हा

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - ‘मी राजा आहे, मला सुट्टीची गरज नाही... मी तुम्हाला बांधील नाही!’ असे म्हणत मद्यधुंद अवस्थेतील ग्रामसेवकाने थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनातच धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार वरोरा पंचायत समितीत घडला. अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत अरेरावी केल्यानंतर ‘तुला बघून घेतो, तुझ्यावर अँट्रॉसिटी लावीन,’ अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चिमूर पंचायत समितीअंतर्गत कार्यरत ग्रामसेवक विवेक तितरे याच्याविरुद्ध वरोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरदुपारी पंचायत समितीत मद्यधुंद प्रवेश

१७ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास वरोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन मारोतीराव मुंडकर हे आपल्या दालनात शासकीय कामकाजात व्यस्त होते. याचवेळी विवेक तितरे हा मद्यधुंद अवस्थेत दालनात आला आणि मोठमोठ्याने आरडाओरड सुरू केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

कार्यालयातील परिचर ज्योती धोंगडे यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तितरे याचा गोंधळ थांबला नाही. परिस्थिती पाहून BDO मुंडकर यांनी त्याची विचारपूस केली. त्यावेळी त्याने आपण चिमूर पंचायत समितीत ग्रामसेवक असल्याचे सांगितले. कार्यालयात उपस्थित प्रणव बक्षी यांनीही तितरे हा आपला बॅचमेट असल्याचे सांगितले.

‘मी राजा आहे... मला कोणी विचारत नाही!’

शासकीय कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत आल्याबाबत BDO मुंडकर यांनी तितरेला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावर त्याने उद्धटपणे ‘मी राजा आहे. मला सुट्टीची गरज नाही. मला कोणी विचारत नाही. मी तुम्हाला बांधील नाही आणि मी इथला कर्मचारीही नाही,’ अशा शब्दांत अरेरावी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अधिकाऱ्यांनी शासकीय कर्मचारी म्हणून कार्यालयीन शिस्त पाळण्याची समज दिल्यानंतर तितरे याचा संताप आणखी वाढल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने BDO मुंडकर यांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ सुरू केली.

अँट्रॉसिटीच्या नावाने दबाव?

शिवीगाळीनंतर तितरे याने अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. ‘तू मला विचारणारा कोण? तुला बघून घेतो. तुझ्यावर ॲट्रॉसिटी लावीन,’ अशी धमकी देत त्याने कार्यालयातील शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात येताच BDO मुंडकर यांनी वरोरा पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांना फोन केल्याचे समजताच तितरे हा आरडाओरड करत कार्यालयातून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यानंतर BDO मुंडकर यांनी वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विवेक तितरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २२१, २९६ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ठाणे प्रभारी निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय गौरकार या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

शासकीय कार्यालयातील ‘राजेपणा’ चर्चेत

शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यानेच वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दालनात मद्यधुंद अवस्थेत जाऊन अरेरावी, शिवीगाळ आणि धमकी दिल्याच्या या कथित प्रकारामुळे पंचायत समितीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘मी राजा आहे’ म्हणत शासकीय शिस्तीलाच आव्हान देण्याच्या या प्रकाराची आता पोलिस तपासात काय निष्पत्ती होते, याकडे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!