वरोरा बाजार समितीच्या चार संचालकांना अपात्रतेची नोटीस; ३० सप्टेंबरला खुलासा सादर करण्याचे आदेश
शेतकऱ्याची बाजारपेठ बनली राजकारणाचा आखाडा.
किंग मेकर पुन्हा गेम पलटवणार ?
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - कृषि उत्पन्न बाजार समिती वरोरा येथील ग्रामपंचायत मतदारसंघातून निवडून आलेल्या चार संचालकांच्या पदाबाबत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर कार्यालयाने महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम १५ अंतर्गत नोटीस बजावली आहे. संबंधित ग्रामपंचायतींची मुदत २८ फेब्रुवारी २०२६ रोजी संपुष्टात आल्याने संचालकपदावर अपात्रता निर्माण झाल्याचा मुद्दा नोटिशीत उपस्थित करण्यात आला आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने २१ सप्टेंबर २०२६ रोजी या नोटिसा जारी केल्या आहेत. त्यामध्ये डॉ. श्री विजय रामचंद्र देवतळे यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजी केलेल्या विनंती अर्जाचा संदर्भ देण्यात आला आहे. संबंधित संचालक ग्रामपंचायत मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून कृषि उत्पन्न बाजार समिती वरोरा येथे संचालक म्हणून निवडून आले असल्याचे नोटिशीत नमूद आहे.
नोटिशीनुसार, चारगाव खुर्द येथील राजू चिकटे, भटाळा हरीश जाधव, एकोना येथील गणेश चवले, आणि जामखुला येथील पुरुषोत्तम पावडे या ग्रामपंचायतींची मुदत २८ फेब्रुवारी २०२६ रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत सदस्यत्वाच्या आधारे बाजार समितीच्या ग्रामपंचायत मतदारसंघातून निवडून आलेल्या संचालकांच्या पात्रतेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम १३(२) नुसार बाजार क्षेत्रात कार्य करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांमधून चार सदस्य निवडून देण्याची तरतूद असल्याचेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर कलम १५ मधील तरतुदीनुसार संबंधित संचालकपद संपुष्टात आले असून पद रिक्त का घोषित करू नये, याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे.
संबंधित संचालकांनी स्वतः किंवा आपल्या वकिलामार्फत कागदोपत्री पुराव्यासह स्वयंस्पष्ट खुलासा ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर यांच्या कार्यालयात उपस्थित राहून सादर करावा, असे नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.
निर्धारित दिवशी खुलासा किंवा म्हणणे सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्यास नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिला आहे.
या प्रकरणामुळे वरोरा कृषि उत्पन्न बाजार समितीतील ग्रामपंचायत मतदारसंघातील संचालकांच्या पदाबाबत आता ३० सप्टेंबरच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.
बाजार समितीचे राजकारण पुन्हा एकदा अलग वळणावर असून पक्षातील किंगमेकर कोणती भूमिका घेणार व सभापती पद कोणाकडे वळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!