पवनीत प्रथमच तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा जल्लोष
शासकीय तालुका क्रीडा संकुलात १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींचा उत्स्फूर्त सहभाग
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.२२/०९/२०२६ क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या कबड्डी क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. २१ व २२ सप्टेंबर रोजी शासकीय तालुका क्रीडा संकुल, पवनी येथे करण्यात आले. पवनी येथे प्रथमच तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित झाल्याने खेळाडू व क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला नगराध्यक्षा डॉ. विजया नंदुरकर, तालुका क्रीडा अधिकारी भोजराज चौधरी, तालुका क्रीडा संयोजक तथा प्राचार्य दिलीप पवार, तालुका युवा राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष तथा क्रीडा प्रशिक्षक तुषार रंगारी, क्रीडा शिक्षक राजेश येलसट्टीवार, राज्य शासन पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. नगराध्यक्षा डॉ.विजया नंदुरकर यांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेचे रीतसर उद्घाटन करण्यात आले.
तालुका क्रीडा संयोजक प्राचार्य दिलीप पवार यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेचे नियोजन, नियम व मार्गदर्शक सूचना स्पष्ट केल्या. अध्यक्षीय भाषणात डॉ.विजया नंदुरकर यांनी पवनी शहरात प्रथमच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पवनी येथील क्रीडा संकुलात स्पर्धा आयोजित करण्यासाठी क्रीडा प्रशिक्षक तुषार रंगारी यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक करून त्यांनी खेळाचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व अधोरेखित केले व सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
तुषार रंगारी यांच्या पाठपुराव्याला यश:
क्रीडा संकुलाचे काम सुरू असल्यामुळे यापूर्वी पवनी येथे तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात अडचणी येत होत्या. मात्र पवनी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने किमान कबड्डीची तालुकास्तरीय स्पर्धा तरी पवनी येथे आयोजित व्हावी, यासाठी तुषार रंगारी यांनी जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन यावर्षी प्रथमच पवनी येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातून त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.
या स्पर्धेत पवनी तालुक्यातील विविध विद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेतील विजयी खेळाडूंना पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तसेच यावर्षी प्रथमच विजयी संघांना जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेदरम्यान तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक,मार्गदर्शक, प्रशिक्षक,पंच,क्रीडाप्रेमी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा प्रशिक्षक निशांत नेवारे यांनी केले,तर आभार प्रदर्शन सुनील डोनेकर यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!