बातमी पब्लिक पंचनामाची... दखल मुनगंटीवारांची! मूल–नागपूर एसटीसाठी नवरात्रीची डेडलाईन;

‘पब्लिक पंचनामा’च्या बातमीची दखल; मुनगंटीवारांचा परिवहनमंत्र्यांना दणका!

मूल–नागपूर थेट एसटीसाठी मुनगंटीवार आक्रमक; नवरात्रीपूर्वी सेवा सुरू करण्याची मागणी, अन्यथा मूल बसस्थानकावर आंदोलनाचा इशारा



मूल : मूल–नागपूर मार्गावरील थेट एसटी बससेवा बंद असल्याचा मुद्दा ‘पब्लिक पंचनामा’ने ठळकपणे मांडल्यानंतर त्याची थेट दखल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. पब्लिक पंचनामाच्या ई-पेपरच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलताना मुनगंटीवार यांनी ‘मूल–नागपूर मार्गावर थेट एसटी बसच नाही!’ या मथळ्याचा विशेष उल्लेख केला आणि ही समस्या सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे जाहीर केले.

विशेष म्हणजे, या घोषणेनंतर अवघ्या दोन तासांत मुनगंटीवार यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र पाठवून नवरात्रोत्सवापूर्वी मूल–नागपूर थेट एसटी बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. सेवा सुरू झाली नाही, तर आपण स्वतः मूल बसस्थानकावर आंदोलन करू, असा स्पष्ट इशाराही त्यांनी पत्रातून दिला आहे.

‘पब्लिक पंचनामा’च्या बातमीने प्रश्न ऐरणीवर

मूल शहराची ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी पार्श्वभूमी लक्षात घेता नागपूरसारख्या उपराजधानीच्या शहराशी थेट एसटी संपर्क नसणे हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित गंभीर प्रश्न असल्याचे ‘पब्लिक पंचनामा’च्या वृत्तातून अधोरेखित करण्यात आले होते.

मूल हे तांदळाचे आगार म्हणून ओळखले जाते. शहराची मोठी बाजारपेठ असून शिक्षण, आरोग्य, व्यापार, रोजगार आणि शासकीय कामांसाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात नागपूरला जावे लागते. मात्र थेट एसटी सेवा नसल्याने नागरिकांना चंद्रपूर अथवा अन्य मार्गाने प्रवास करावा लागत असून वेळ आणि आर्थिक खर्च दोन्ही वाढत आहेत.

पूर्वी होत्या तब्बल १५ फेऱ्या

मुनगंटीवार यांनी परिवहन मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात काही वर्षांपूर्वी मूल–नागपूर मार्गावर एसटीच्या दिवसभरात सुमारे १५ फेऱ्या होत असल्याचा उल्लेख केला आहे. या फेऱ्यांमुळे विद्यार्थी, रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, व्यापारी तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठा आधार मिळत होता.

मात्र सध्या या मार्गावरील एसटी फेऱ्या बंद झाल्याने खासगी ट्रॅव्हल्सवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. एसटीच्या विविध सवलतींचा लाभ महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळत असताना खासगी वाहतुकीमुळे या प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

खासगी ट्रॅव्हल्सच्या फेऱ्यांवरूनही प्रश्न

एसटीच्या फेऱ्या बंद झाल्यानंतर मूल–नागपूर मार्गावर खासगी ट्रॅव्हल्सच्या मोठ्या प्रमाणात फेऱ्या सुरू असल्याचा मुद्दाही ‘पब्लिक पंचनामा’च्या वृत्तातून उपस्थित करण्यात आला होता. एसटीच्या फेऱ्या बंद होण्यामागे नेमके कारण काय, याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रात या प्रकाराची गंभीर दखल घेत जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एसटी सेवा बंद झाल्याचा सर्वाधिक फटका आर्थिकदृष्ट्या गरजू प्रवाशांना बसत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

‘नवरात्रीपूर्वी सेवा सुरू करा’

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिलेल्या पत्रात मुनगंटीवार यांनी नवरात्रोत्सवापूर्वी मूल–नागपूर बससेवा पूर्ववत सुरू करण्याची स्पष्ट मागणी केली आहे. या मागणीची दखल घेतली नाही आणि सेवा सुरू झाली नाही, तर विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून आपण स्वतः आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मूल–नागपूर बससेवा हा केवळ प्रवासाचा प्रश्न नसून विद्यार्थी, रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजेशी जोडलेला विषय आहे. त्यामुळे आता परिवहन विभाग आणि राज्य परिवहन महामंडळ या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे मूल शहर व तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

एका बातमीपासून आंदोलनाच्या इशाऱ्यापर्यंत...

‘पब्लिक पंचनामा’ने प्रश्न मांडला → ई-पेपरच्या शुभारंभात आमदार मुनगंटीवार यांनी मुद्दा उचलला → थेट बससेवा सुरू करण्याचे जाहीर केले → दोन तासांत परिवहनमंत्र्यांना पत्र → नवरात्रीपूर्वी सेवा सुरू करण्याची मागणी → अन्यथा मूल बसस्थानकावर आंदोलनाचा इशारा.

मूल–नागपूर थेट एसटीचा प्रश्न आता केवळ नागरिकांची मागणी न राहता राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरही ऐरणीवर आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!