चाकूहल्ला प्रकरणातील दोन्ही आरोपींना अखेर जामीन; ॲड. शनैशचंद्र श्रीरामे यांच्या युक्तिवादाला यश

शिवार हाट बाजारातील भाजी विक्रेत्यांच्या वादात दोन सख्खे भाऊ जखमी; प्रत्येकी ₹५० हजारांच्या जातमुचलका व सक्षम जामीनदाराच्या अटीवर जामीन मंजूर

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे चिमूर नगर परिषदेने शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात नव्याने सुरू केलेल्या शिवार हाट बाजारात रविवार, दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास भाजी विक्रीच्या कारणावरून दोन गटांतील विक्रेत्यांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन भाजी कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चाकूने वार करण्यात आल्याने दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे बाजार परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेत गणेश देवराव लोथे (वय ३५) आणि नितेश देवराव लोथे (वय ३२) हे दोघे भाऊ जखमी झाले. वादानंतर दोन्ही जखमी रक्तबंबाळ अवस्थेतच दुचाकीने चिमूर पोलीस ठाण्यात पोहोचले आणि संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी उपलेश उर्फ प्रज्वल महेश रासेकर (वय २२) आणि दीपक केशव साखरकर (वय ३०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर जखमींना उपचारासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान नितेश लोथे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणातील दोन्ही आरोपींना चिमूर न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींच्या वतीने ॲड. शनैशचंद्र श्रीरामे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. युक्तिवादानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना प्रत्येकी ₹५०,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलका व सक्षम जामीनदाराच्या अटीवर जामीन मंजूर केला.

न्यायालयाच्या महत्त्वाच्या अटी

न्यायालयाने जामीन मंजूर करताना आरोपींवर विविध अटी घातल्या आहेत. त्यानुसार आरोपींनी कोणत्याही प्रकारे फिर्यादी अथवा अभियोजन पक्षाच्या साक्षीदारांना धमकी किंवा प्रलोभन देऊ नये, तसेच त्यांच्या साक्षी अथवा पुराव्यात हस्तक्षेप करू नये, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

तसेच तपास यंत्रणेला आवश्यक तेव्हा सहकार्य करणे, पुन्हा अशाच स्वरूपाचा कोणताही गुन्हा न करणे आणि तपासी अधिकाऱ्याने लेखी नोटीसद्वारे निर्देश दिल्यास आरोपपत्र दाखल होईपर्यंत संबंधित पोलीस ठाण्यात हजर राहणे, या अटीही घालण्यात आल्या आहेत.

याशिवाय आरोपींना स्वतःच्या निवासी पत्त्याच्या ओळखपत्राची प्रत तसेच दोन रक्ताच्या किंवा जवळच्या नातेवाईकांच्या ओळखपत्रांच्या प्रती व त्यांचे मोबाईल क्रमांक सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिमूर पोलीस करीत आहेत. जामीन मंजूर झाल्यानंतर आता या प्रकरणातील पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया काय वळण घेते, याकडे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!