खेडेपारमध्ये सीमाविना उत्खननाचा आरोप; चौकशी करून उत्खनन तात्काळ थांबविण्याची मागणी
जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन; चौकशीच्या मागणीला प्रशासन काय प्रतिसाद देते, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - लाखनी तालुक्यातील मौजा खेडेपार येथील गट क्रमांक 129/1, 123/1, 135, 134, 134/1, 134/2 व 133/2 या जमिनीवर सुरू असलेल्या उत्खननाबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आला आहे. सीमा एंटरप्रायझेस कंपनीकडून तहसीलदार लाखनी यांच्याशी संगनमत करून अवैधपणे व मनमानी पद्धतीने उत्खनन सुरू असल्याचा आरोप युवा सेना, जिल्हा प्रमुख अंकुश बंजारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केला आहे.
निवेदनानुसार, संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले असून काही ठिकाणी सुमारे १५० फूट खोलीपर्यंत उत्खनन झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नैसर्गिक जलस्रोत, शेतजमीन तसेच शेतकऱ्यांच्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या उत्खननामुळे परिसरातील पाण्याच्या पातळीवर परिणाम होण्याची शक्यता असून, भविष्यात शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी चिंता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. उत्खननासाठी आवश्यक असलेल्या नियमांचे व परवानगीच्या अटींचे पालन करण्यात आले आहे का, याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन शक्य आहे का? असा सवाल उपस्थित करत संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडत असल्यास त्याचीही तपासणी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, सदर प्रकरणाची चौकशी करून अवैध उत्खनन तात्काळ बंद करावे, तसेच संबंधित कंपनी व जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका तपासून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!