इमारतीला तडे, विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी
नेरीतील रामपूर जिल्हा परिषद शाळेची दैनावस्था; दुर्घटनेची वाट पाहतंय का प्रशासन?
प्रतिनिधी - शुभम बारसागडे
चिमुर / नेरी : - एकीकडे गुणवत्तेचा उर बडवणारा शिक्षण विभाग आणि दुसरीकडे निधीच्या मग्रुरीत मश्गुल असलेली ग्रामपंचायत... या दोघांच्या भोंगळ कारभाराचा फटका रामपूर (जि. प.) शाळेतील चिमुकल्यांना बसत आहे. वर्गाच्या भिंतींना ठिकठिकाणी गेलेले मोठे तडे, उखडलेली फरशी आणि डोक्यावर टांगती तलवार बनलेले छत अशा अत्यंत धोकादायक वातावरणात सध्या या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे गिरवावे लागत आहेत. एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल आता पालक विचारत आहेत.
नेरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या रामपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत सध्या मरणकळा भोगत आहे. भिंतींना भेगा पडल्याने इमारतीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. वर्गखोल्यांची दुरवस्था पाहता, इथे अभ्यास सुरू आहे की अपघाताला आमंत्रण दिले जात आहे, असा प्रश्न पडतो.
निधीचा अपव्यवहार अन् पदाधिकाऱ्यांची मौनव्रत धारणा
शाळेच्या दुरुस्तीसाठी किंवा नवीन इमारतीसाठी ग्रामस्थांनी नेरी ग्रामपंचायतीकडे खेटे घातले. ग्रामसभेत जाब विचारला असता लोकप्रतिनिधींनी केवळ 'मान हालवून' मूग गिळणे पसंत केले. "ग्रामपंचायतीचे पदाधिकारी केवळ मजा मारण्यात आणि निधीचा अपव्यवहार करण्यात गुंग आहेत. त्यांना चिमुकल्यांच्या जिवाची कोणतीही पर्वा नाही," असा घणाघाती आरोप रामपूर येथील संतप्त नागरिकांनी केला आहे.
प्रशासकीय अनास्था : अर्जांची केराची टोपली
शिक्षण विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने पाहणी करून नवीन इमारत मंजूर करावी, अशी रास्त मागणी पालकांनी लावून धरली आहे. मात्र, ढिम्म प्रशासनाने या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.
एखादी अप्रिय घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा थेट सवाल उपस्थित करत, प्रशासनाने कागदी घोडे नाचवणे थांबवून तात्काळ नवीन इमारतीचे काम सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त पालकांनी व ग्रामस्थांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!