मूलच्या बेरोजगारांना सुवर्णसंधी! ना भांडवल, ना जागा; महिन्याला लाखोंची कमाई

मूलच्या बेरोजगारांना सुवर्णसंधी!

ना भांडवल, ना जागा; महिन्याला लाखोंची कमाई!

“काय तुम्ही बेरोजगार आहात?”
“ताई, तुम्ही मूलला राहता?”

दोन्ही प्रश्नांचे उत्तर ‘हो’ असेल तर थांबा... तुमच्यासाठी मूल शहरात एक भन्नाट रोजगाराची सुवर्णसंधी चालून आली आहे!

त्यासाठी ना भांडवलाची गरज, ना दुकानाची जागा. वीज नको, कामगार नको, मोठमोठ्या यंत्रांची गरज नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही प्रशिक्षणाचीही आवश्यकता नाही!

फक्त डुकरांचा मुक्त संचार पाहा आणि व्यवसाय सुरू करा!

होय... सध्या मूल शहरातील गल्लीबोळ, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे एवढेच काय तर नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचलेल्या डुकरांमुळे बेरोजगार युवकांसाठी एक ‘नवा उद्योग’ उपलब्ध झाला आहे.

कच्चा माल शहरातच उपलब्ध!

या उद्योगासाठी डुकरांचा शोध घेण्यासाठी दूरवर जाण्याची गरज नाही. शहरातील अनेक भागांत डुकरे सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे ‘कच्च्या मालाची कमतरता’ हा प्रश्नच नाही.

जागा नाही? चिंता नको!

डुकरांनी स्वतःच शहरातील सार्वजनिक जागा, रस्ते आणि मोकळे परिसर निवडून घेतले आहेत.

मुख्य म्हणजे हा उद्योग सुरू करण्यासाठी मनुष्यबळची गरज नाही! विजेची गरज नाही!!! आणि नगर परिषदेच्या परवानगीची ही गरज नाही..  नगर परिषदेची तशीही मुक संमती आहे

 गुंतवणूक शून्य!  शंभर टक्के नफा...  

या ‘व्यवसायात’ सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूक जवळपास शून्य आणि नफा... फक्त नफा आणि नफा!

म्हणूनच मूलच्या बेरोजगार युवकांनी पारंपरिक व्यवसायांच्या मागे धावण्यापेक्षा या नव्या संधीचा गांभीर्याने विचार करावा, असा टोला नागरिकांकडून लगावला जात आहे.

मात्र हा सगळा उपरोध आहे. कारण प्रत्यक्षात परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

डुकरे घरात शिरत आहेत; नागरिक त्रस्त

मूल शहरातील विविध भागांत डुकरांचा मुक्त संचार वाढला असून, आता डुकरांनी थेट नागरिकांच्या घरात प्रवेश करण्यास सुरुवात केल्याच्या तक्रारी आहेत. सार्वजनिक ठिकाणी घाण होत आहे. रस्ते व परिसर अस्वच्छ होत आहेत. शहरातील प्रमुख व्हाट्सॲप ग्रुपवर नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात असतानाही या समस्येवर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची नागरिकांची भावना आहे.

डुकरांचा वाढता वावर हा केवळ शहराच्या सौंदर्याचा किंवा अस्वच्छतेचा प्रश्न नाही. त्यांच्या मुक्त संचारामुळे घाण, कचरा आणि सांडपाण्याशी संबंधित आरोग्यविषयक धोके वाढू शकतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा थेट परिणाम होऊ शकतो.

डुकरांमुळे रस्त्यावर वाहतुकीचा अडथळा निर्माण होणे, नागरिकांच्या घरात घुसणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता वाढणे आणि रोगराईचा धोका निर्माण होणे, असे अनेक प्रश्न गंभीरपणे समोर येत आहेत.

त्यामुळे “डुकरांचा प्रश्न म्हणजे केवळ डुकरांचा प्रश्न नाही; हा सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे,” हे नगरपरिषद प्रशासनाने लक्षात घेण्याची गरज आहे.

नागरिकांच्या तक्रारींची केवळ नोंद न घेता डुकरांचा बंदोबस्त, स्वच्छता व्यवस्था आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यासाठी ठोस कृती आराखडा राबविण्याची आवश्यकता आहे.

बेरोजगारांसाठी ‘सुवर्णसंधी’ हा उपरोध कदाचित वाचताना मनोरंजक वाटेल; पण नागरिकांच्या घरात डुकरे शिरण्याची वेळ येणे ही प्रशासनासाठी निश्चितच गंभीर बाब आहे. आता तरी संबंधित यंत्रणेने जागे होऊन मूल शहराला या समस्येतून मुक्त करावे, हीच नागरिकांची अपेक्षा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!