बाल कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ; सोमवारी वार्डात तान्हा पोळा उत्साहात

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि. १३ सप्टेंबर — तान्हा पोळ्यानिमित्त पवनी शहरातील सोमवारी वार्ड परिसरात नंदी सजावट व वेशभूषा स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. सक्सेना प्राथमिक शाळेच्या पटांगणात झालेल्या या कार्यक्रमाला बालगोपाल, पालक तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्यासोबतच बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात तब्बल २०० बालगोपालांनी सहभाग नोंदविला.

नंदी सजावट स्पर्धेत बालकांनी आपल्या कल्पकतेचा, कलात्मकतेचा आणि सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार सादर केला. आकर्षक सजावट व नाविन्यपूर्ण कल्पनांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत मोक्षीत कोरे याने प्रथम, नित्या कडुकर हिने द्वितीय, तर अर्णव भोगे याने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
वेशभूषा स्पर्धेतही बालगोपालांनी विविध पारंपरिक व आकर्षक वेशभूषा सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. यामध्ये मानस बिसने याने प्रथम, नित्या रायपुरकर हिने द्वितीय, तर मिस्कान कोल्हे हिने तृतीय क्रमांक मिळविला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पवनीच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. विजया नंदुरकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून राकेश बिसने, मोरेश्वर भोगे, सुधीर भोगे, आशिष फुलबांधे, दिलीप भोगे, श्रावण भोगे, नत्थुजी रायपुरकर व रवि भिसेकर उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी, देवेंद्र हरडे, शशिकांतजी भोगे, राजेंद्र गिन्हेपूंजे व दुर्गदेव तिमांडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे सदस्य प्रणय धुरई, प्रतीक भोगे, अनिकेत बिसने, अंशुल बिसने, हर्षल बिसने व आकाश रायपुरकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राकेश बिसने यांनी केले.

तान्हा पोळ्यानिमित्त आयोजित या उपक्रमातून बालकांना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले. तसेच पारंपरिक सण-उत्सवांची संस्कृती आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा सुंदर संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!