सिंदेवाहीत एकाच रात्रीत दोन ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ; ९० हजारांचा ऐवज लंपास, चप्पल-मोटरसायकल सोडून पळाले चोरटे
सिंदेवाही (यश कायरकर,)
सिंदेवाही शहरातील साई नगरी परिसरात मंगळवार-बुधवारच्या मध्यरात्री (दि. ९ सप्टेंबर २०२६) चोरी आणि चोरीच्या प्रयत्नाची खळबळजनक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी एका बंद घरातून सुमारे ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला, तर दुसऱ्या घरात प्रयत्न फसल्याने चोरट्यांनी मोटारसायकल आणि चप्पल घटनास्थळीच सोडून पळ काढला.
*काय घडलं?*
साई नगरी येथील रहिवासी भगवान मंडलवार हे बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा अंदाजे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.
त्यानंतर चोरट्यांनी शेजारीच असलेल्या सुनील उईके यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न केला. मात्र परिसरात नागरिक असल्याची चाहूल लागल्याने नागरिकांनी ‘चोर... चोर...’ असा आवाज दिला. घाबरलेल्या चोरट्यांनी तेथून पळ काढला. पळताना त्यांची मोटारसायकल आणि चप्पल घटनास्थळीच राहिली. काही वेळाने ती मोटारसायकल नेण्यासाठी चोरटे पुन्हा आले, मात्र नागरिकांनी पुन्हा पाहिल्याने ते पुन्हा पसार झाले.
ही संपूर्ण घटना रात्री घडली असली तरी सकाळी परिसरात पाहणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
CCTV मध्ये कैद झाले चोरटे
परिसरातील CCTV फुटेजमध्ये तोंडाला रुमाल बांधलेले दोन चोरटे टिकासारख्या लोखंडी हत्याराने दरवाजाचा हँडल आणि लॉक तोडताना स्पष्टपणे कैद झाले आहेत.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे.
हा तपास पोलीस अधीक्षक *आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर* यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तर पोलीस निरीक्षक *कांचन पांडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम* यांच्या नेतृत्वाखाली पथक चोरट्यांचा शोध घेत आहे.
सोडून गेलेल्या मोटारसायकल, चप्पल आणि CCTV फुटेजच्या आधारे सिंदेवाही पोलीस चोरट्यांच्या मागावर आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!