भाजप मंडळ अध्यक्ष तथा माजी सरपंच गजानन गुळधे यांना अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक!

आठ दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला चिमूर पोलिसांनी पहाटे ६.३० वाजता घेतले ताब्यात; चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चिमूर तालुक्यातील आदर्श सातारा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा भारतीय जनता पक्षाचे चिमूर मंडळ अध्यक्ष गजानन धनराज गुळधे यांच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली चिमूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित प्रकरणी चिमूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी गजानन गुळधे हे पोलिसांना मिळून येत नसल्याने ते फरार असल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, सलग आठ दिवसांच्या कालावधीनंतर दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजताच्या सुमारास चिमूर पोलिसांनी सातारा येथील त्यांच्या राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेऊन अटक केली.

अटकेनंतर आरोपीला चिमूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, गजानन गुळधे हे आदर्श ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून, आदर्श ग्रामपंचायतीच्या कार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आल्याची पार्श्वभूमी आहे. तसेच ते आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांचे निकटवर्तीय समर्थक म्हणूनही परिचित आहेत. त्यामुळे या प्रकरणाची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.

आता पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे लक्ष

अल्पवयीन मुलीशी संबंधित हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने तपासाची दिशा, पोलिसांकडून सादर होणारे पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
व या प्रकरणाचा पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!