किर्गिस्तानमध्ये नागभीड च्या विजय दैवलकरने पटकावली भारतासाठी दोन सुवर्णपदके
यश कायरकर ,नागभीड:
किर्गिस्तान येथे ८ ते १२ सप्टेंबर दरम्यान आयोजित १३ व्या वर्ल्ड सिनियर-ज्युनियर स्ट्रेंथ लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये नागभीडच्या सुपुत्राने भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे.
६८ किलो वजनी गटात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना *विजय संजय दैवलकर* याने वर्ल्ड स्ट्रेंथ लिफ्टिंग आणि इन्क्लाइन बेंच प्रेस या दोन्ही प्रकारांमध्ये दोन सुवर्णपदके (Gold Medals) जिंकून जागतिक स्तरावर देशाचे नाव रोशन केले आहे. या जागतिक स्पर्धेत विविध देशांतील दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या चुरशीच्या लढतीत विजयने आपल्या कठोर परिश्रमाच्या जोरावर ही दुहेरी कामगिरी केली आहे. त्याच्या या ऐतिहासिक यशाचे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात आणि क्रीडा विश्वात जोरदार कौतुक होत आहे.
*'के के फिटनेस' मध्ये घाम गाळला; प्रशिक्षक शुभम सुरपाम यांच्याकडून अभिनंदन*
या मोठ्या स्पर्धेसाठी विजय 'के के फिटनेस' जिममध्ये नियमित सराव करत होता. त्याचे प्रशिक्षक *शुभम सुरपाम* यांनी विजयच्या या ऐतिहासिक यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे. शुभम म्हणाले, "विजय अत्यंत मेहनती खेळाडू आहे. घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत तो दररोज कठोर मेहनत आणि सराव करायचा, याच शिस्तीमुळे आज त्याने हे यश मिळवले आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तो पुढेही देशासाठी असेच दमदार प्रदर्शन करत राहील."
*कर्ज काढून पोहोचला किर्गिस्तानला; हलाखीच्या परिस्थितीत जिंकले सोने*
विजयचे हे यश केवळ पदक नाही, तर त्याच्या कठोर संघर्षाची कहाणी आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आणि घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही विजयने हिंमत हारली नाही. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याने बँकेकडून कर्ज घेतले आणि किर्गिस्तान गाठले. आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या बळावर गरिबीवर मात करत त्याने देशाला गौरव मिळवून दिला आहे.
क्रीडाप्रेमींचे मत आहे की, विजयसारख्या होतकरू आणि प्रतिभावान खेळाडूंना वेळेवर शासकीय मदत किंवा प्रायोजकत्व (Sponsorship) मिळाले, तर ते भविष्यात देशासाठी आणखी मोठे विक्रम करू शकतात.
*- यश कायारकर, नागभीड तालुका प्रतिनिधी.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!