श्रावणाची ‘नो एंट्री’ संपली! मांसाहाराची ‘ग्रँड एंट्री’!

श्रावण संपला, खवय्यांचा संयमही संपला!

बळग्याला दोन टन कोंबडी, दोनशेवर बकरे अन् दोन टन मच्छी सह दीड लाख अंडा विक्री चा अंदाज!

मूल | प्रतिनिधी

महिनाभर कोंबडीने कोंबडा आरवला, बकऱ्यांनी ‘में...में...’ केले, मच्छीने पाण्यात पोहून घेतले आणि अंड्यांनी टोपलीत पडून दिवस मोजले! कारण श्रावण होता. आता श्रावण संपला... आणि बळग्याच्या निमित्ताने खवय्यांच्या संयमाचा बांध फुटणार आहे. आज मूल तालुक्यात ताटापेक्षा मांसाहाराची चर्चा आणि देवघरापेक्षा स्वयंपाकघरात मसाल्याचा सुगंध दरवळणार आहे.

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बळग्याला मांसाहार करण्याची परंपरा असल्याने महिनाभर ‘वर्ज्य’ असलेल्या कोंबडी-मटणाचे घराघरात स्वागत होणार आहे.  कुणाच्या घरी चिकनचा बेत, कुणाच्या घरी मटणाचा रस्सा, तर कुणाच्या ताटात तळलेली मच्छी—आजचा दिवस खवय्यांसाठी जणू श्रावणानंतरचा ‘स्वातंत्र्यदिन’च!

दोन टन कोंबडीचा फडशा!

मूल शहरातील प्रसिद्ध कोंबडी व मास विक्रेते कुणाल पारधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मूल तालुक्यात तब्बल दोन टन कोंबड्या कापल्या जाण्याचा अंदाज आहे. यातील सुमारे एक टन शहरात आणि एक टन ग्रामीण भागात खपण्याची शक्यता आहे.

दोनशेवर बकऱ्यांचा नंबर!

मटणप्रेमींचाही उत्साह काही कमी नाही. तालुक्यात आज दोनशेहून अधिक बकरे कापले जाण्याचा अंदाज आहे. शहरातील दुकानांमध्ये सुमारे ५०, आपसी किंवा समाजातील हिस्सेदारीत आणखी ५०, तर ग्रामीण भागात १०० हून अधिक बकरे कापले जाण्याची शक्यता आहे.

मच्छीही ‘स्विमिंग’ सोडून ताटात!

मच्छीप्रेमींसाठीही आजचा दिवस खास आहे. गावागावांत मच्छीची आवक वाढली असून, तालुक्यात सुमारे दोन टन मच्छीची विक्री होण्याचा अंदाज आहे.

दिड लाख अंड्यांची होणार विक्री 

कोंबडी-मटणाच्या जोडीला अंड्यांचाही बाजार तापणार असून, आज दीड लाखाहून अधिक अंड्यांची विक्री होण्याची शक्यता व्यवसायातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

थोडक्यात..

  • कोंबडी — २ टन
  • बकरे — २०० हून अधिक
  • मच्छी — सुमारे २ टन
  • अंडी — दीड लाख र

हे सर्व आकडे व्यवसायातील जाणकारांनी मागील वर्षीच्या विक्री चे आकड्यावरून व्यक्त केलेले अंदाज आहेत.

श्रावणात संयम, बळग्याला उत्साह—ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे. त्यामुळे आज बाजारात कोंबडी-मटणाच्या दुकानांपासून मच्छी विक्रेत्यांपर्यंत लगबग असणार, तर घराघरातील चुलींवर महिनाभरानंतर ‘मांसाहारी पुनरागमनाचा’ झणझणीत सोहळा रंगणार आहे.

काय आहे तुमच्या घरचा आजचा बेत? कॉमेंट करून नक्की सांगा! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!