कागदोपत्री सात क्रीडांगणे पूर्ण, मग मैदानावर काम कुठे?
खडसंगी ग्रामपंचायतीतील मनरेगाच्या रु १७.८६ लाखांवर गंभीर प्रश्नचिन्ह; “कागदावर विकास, प्रत्यक्षात अर्धवट कामे” असा ग्रामस्थांचा आरोप
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील पंचायत समिती, चिमूर अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत खडसंगी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या सात क्रीडांगणांच्या कामाबाबत गंभीर अनियमिततेचे आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आले आहेत. संबंधित कामे प्रत्यक्षात पूर्ण झालेली नसतानाही कागदोपत्री कामे पूर्ण झाल्याचे दाखवून तब्बल १७ लाख ८६ हजार २४७ रुपयांची रक्कम उचलण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीनुसार, खडसंगी ग्रामपंचायतीमध्ये मनरेगा योजनेंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात सात क्रीडांगणांची कामे मंजूर करण्यात आली होती. या कामांसाठी एकूण रुपये १७,८६,२४७/- इतका निधी मंजूर करण्यात आला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता मंजूर सातही क्रीडांगणांची कामे पूर्ण झालेली दिसून येत नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
विशेष म्हणजे, संबंधित कामे कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवून त्याची संपूर्ण रक्कम उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्ष जागेवर मात्र अर्धवट अवस्थेतील बॉस्केटबॉल ग्राउंडचे काम दिसून येत असून, मंजूर निधीच्या तुलनेत प्रत्यक्ष कामाची स्थिती अत्यंत अपूर्ण असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
निधीचा विनियोग नेमका कुठे झाला?
मनरेगा योजनेंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देतानाच गावातील सार्वजनिक उपयोगाच्या मालमत्ता व सुविधा निर्माण करण्याचा शासनाचा उद्देश आहे. अशा परिस्थितीत मंजूर कामे प्रत्यक्षात पूर्ण न करता कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवून निधीची उचल झाली असल्यास ही बाब गंभीर मानली जाऊ शकते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
१७ लाख ८६ हजार २४७ रुपयांचा निधी नेमका कोणत्या कामावर खर्च करण्यात आला? सात क्रीडांगणांची प्रत्यक्ष स्थिती काय आहे? कामांची मोजमाप पुस्तिका (एम.बी.), प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, अंदाजपत्रक, कामाचे बिल, हजेरीपत्रक, मस्टर रोल तसेच निधी वितरणाची कागदपत्रे यांची तपासणी करण्यात आली आहे का? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.
ग्रामस्थांची गट विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचारी अथवा जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी, पंचायत समिती चिमूर यांच्याकडे तक्रारीद्वारे केली आहे.
चौकशीदरम्यान मंजूर सातही क्रीडांगणांच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करावी, कामाची सद्यस्थिती नोंदवावी, मंजूर अंदाजपत्रकानुसार किती काम झाले आणि किती काम शिल्लक आहे याची मोजणी करावी, तसेच संबंधित कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
प्रत्यक्ष पाहणी आणि कागदपत्रांची तपासणी आवश्यक
या प्रकरणात केवळ कागदोपत्री नोंदींच्या आधारे नव्हे, तर प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मंजूर निधीच्या तुलनेत प्रत्यक्ष काम किती झाले, कामाची गुणवत्ता कशी आहे आणि शासनाच्या निकषांनुसार काम पूर्ण झाले आहे की नाही, याची स्वतंत्रपणे तपासणी झाल्यास वस्तुस्थिती समोर येऊ शकते.
तसेच संबंधित कामांच्या मोजमाप पुस्तिका, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, कामाचे आदेश, मस्टर रोल, देयके, बिल-वाउचर आणि निधीच्या व्यवहारांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार ग्रामस्थांनी केली आहे.
चौकशीत सत्य बाहेर येणार का?
खडसंगी ग्रामपंचायतीतील मनरेगा अंतर्गत मंजूर सात क्रीडांगणांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्याचे कागदोपत्री दाखविले जात असताना प्रत्यक्षात कामे अपूर्ण असल्याच्या आरोपामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे पंचायत समिती प्रशासन या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करणार का आणि चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांकडून निधीची वसुली करून कारवाई करणार का, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
ग्रामस्थांच्या तक्रारीतील आरोपांची अधिकृत चौकशी होऊन प्रत्यक्ष वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक असून, चौकशीअंतीच या प्रकरणातील जबाबदारी निश्चित होणार काय असी समस्त खडसंगी वासिय ग्रामस्थांनी मागणी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!