जांभुळघाटमध्ये रात्री वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा!
लाईनमन व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा नागरिकांना फटका; अंधारात रात्र काढण्याची वेळ
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - तालुक्यातील मौजा जांभुळघाट येथे मागील आठ दिवसांपासून रात्रीच्या वेळेस वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वीजपुरवठा बंद झाल्यानंतर विद्युत बिघाड दुरुस्त करण्यासाठी संबंधित कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
जांभुळघाट येथे ३३ के.व्ही. क्षमतेचे वीज उपकेंद्र असतानाही २४ तास वीजपुरवठ्याच्या देखभालीसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ‘फेस’ टाकण्यासाठी संबंधित लाईनमन उपलब्ध नसल्याने अनेकदा नागरिकांना बराच वेळ अंधारात राहावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
गावातील एका लाईनमनच्या अनुपस्थितीमुळे आठवड्यातील काही दिवस विद्युत देखभालीचे काम प्रभावित होत असल्याची नागरिकांची माहिती आहे. त्याचा थेट परिणाम वीजपुरवठ्यावर होत असून, पर्यायी कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांकडून संबंधित लाईनमन तसेच अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, अनेकदा फोनला प्रतिसाद मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे विद्युत विभागाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सततच्या वीज खंडित होण्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी घरातील पंखे बंद पडल्याने उकाड्यात झोपावे लागत असून, अंधारामुळे सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जांभुळघाट येथे २४ तास कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास तातडीने दुरुस्ती पथक पाठवावे आणि वारंवार होणाऱ्या बिघाडाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या गंभीर समस्येकडे संबंधित अभियंता व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!