ग्रामपंचायत खडसंगीच्या कारभाराविरोधात बेमुदत धरणे आंदोलन
भ्रष्टाचार व अनियमिततेच्या चौकशीसह २० मागण्यांसाठी ग्रामस्थ मैदानात
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील ग्रामपंचायत खडसंगी येथील भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार व कारभारातील अनियमिततेविरोधात ग्रामस्थांनी दिनांक. ४ सप्टेंबर २०२६ पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. गावाच्या विकासासाठी पारदर्शक कारभार व विविध प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आंदोलनाच्या माध्यमातून एकूण २० प्रमुख मागण्या प्रशासनासमोर ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विशेष ग्रामसभा तातडीने आयोजित करणे, २४ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेतील सर्व प्रश्नांची मुद्देनिहाय व साक्षांकित लेखी उत्तरे देणे, तसेच ग्रामपंचायतीच्या सर्व विकासकामांची अंदाजपत्रके, मंजुरी, वर्क ऑर्डर, एम.बी., बिल-व्हाउचर, जीएसटी विवरणपत्रे व पूर्णत्व प्रमाणपत्रे ग्रामसभेसमोर सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच १४ वा/१५ वा वित्त आयोग, मागासवर्गीय निधी, महिला-बालकल्याण निधी व इतर निधीचा लेखापरीक्षित हिशोब जाहीर करावा, ३० ऑक्टोबर २०२५ च्या चौकशी अहवालानुसार Action Taken Report (ATR) सार्वजनिक करावा, वित्तीय गैरव्यवहारात दोषींवर वसुली करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम १८७ च्या तरतुदीनुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मागील पाच वर्षांतील सर्व विकासकामांचे स्वतंत्र वित्तीय व तांत्रिक थर्ड-पार्टी ऑडिट करावे, सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक अथवा मस्टर पद्धतीने उपस्थिती सक्तीची करावी आणि ग्रामपंचायत खडसंगी येथे कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी/सचिव नियुक्त करावा, अशीही मागणी आहे.
याशिवाय जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्येनुसार शिक्षक पदे तात्काळ भरणे करावी , चिमूर-वरोरा मार्गावरील बंद पथदिव्यांची पाहणी करून दिवाबत्ती व्यवस्था पूर्ववत करणे, शासकीय दूध शीतकरण केंद्राच्या भूखंडावरील अतिक्रमण MLRC अंतर्गत तात्काळ हटविणे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीच्या प्रस्तावास विशेष मंजुरी देणे, सन २०२० पासून प्रलंबित आरटीआय अर्जांचा निपटारा करणे, माहिती न दिल्यास कलम २० अंतर्गत कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करावी,
सर्व विकास कामांची माहिती 'सिटिअन चाटर्र' व माहिती फालकावर प्रदर्शीत करावी, प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल) पात्र लाभार्थ्यांना मंजुरी देऊन पहिला हप्ता तात्काळ वितरित करावा, हयात स्मशानभूमीचे सुशोभीकरण व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, पांढरपौनी स्मशानभूमी प्रस्तावास मंजुरी देऊन जमीन संपादन व निधी उपलब्ध करून द्यावा, गावात व्हेंडर झोन निश्चित करून सर्व विक्रेत्यांचे तेथे स्थलांतर करावे तसेच मुख्य सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणे चिन्हित करून तातडीने हटवावीत यावी, अशा मागण्यांचाही समावेश आहे.
“पारदर्शक कारभार हा आमचा अधिकार असून अन्याय सहन केला जाणार नाही”, अशी भूमिका घेत गावाच्या विकासासाठी बेमुदत आंदोलन ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत समोर सुरू आहे. या मागण्यांवर प्रशासनाकडून काय कार्यवाही केली जाते, याकडे समस्थ ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!