सावलीत सरपंच आरक्षण सोडतीत सावळा गोंधळ - चिठ्या न टाकताच आरक्षण जाहिर @ तहसीलदारांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर
सावलीत सरपंच आरक्षण सोडतीत सावळा गोंधळ - चिठ्या न टाकताच आरक्षण जाहिर
@ तहसीलदारांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर
सावली (विजय कोरेवार ) - ग्रामपंचायत सन २०२५-३० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक सरपंच पदाचे आरक्षण ४ सप्टेंबर ला तहसील कार्यालयाचे सभागृहात जाहीर करण्यात आले. मागील आरक्षणात नागरिकांचा मागास प्रवर्गास जास्त दिलेले आरक्षण कमी करुन सर्वसाधारण प्रवर्गात वाढ करण्यासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. मात्र आरक्षण सोडत चिठ्या न टाकता बेकायदेशीर सोडत पार पाडल्याची चर्चा असून यावर आक्षेप अर्ज घेण्यासही तहसीलदार टाळाटाळ करीत आहेत. यामुळे आरक्षण सोडतीत सावळा गोंधळ झाल्याची जोरदार चर्चा असून जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे जागरूक नागरिकांनी तक्रार केली आली आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ च्या नियम २-ज (१) (२) नुसार सन २०२५-२०३० या ५ वर्षाच्या कालावधीसाठी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्गाचा प्रवर्ग आणि खुला प्रवर्गातील महिलांकरीता शासनाने सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करुन दिलेले आहे. यापूर्वी २३ एप्रिल २०२५ व ८ जुलै २०२५ ला सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली होती. मात्र नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे जागा कमी करुन सर्वसाधारण प्रवर्गाचे जागा वाढविण्यात आल्याने सावली तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीकरीता सरपंच पदाची आरक्षण सोडत सभा तहसीलदार प्रांजली चिरडे यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय सावली येथील सभागृहात ४ सप्टेंबरला सोडत पार पडली. अनुसुचित जातीकरीता ६, अनुसुचित जमाती करीता ८, नागरिकांचा मागासप्रवर्गाचा प्रवर्ग करीता १३, सर्वसाधारण प्रवर्गकरिता करीता २७ जागा आरक्षित करण्यात आले. तहसीलदार यांनी तयार करुन ठेवलेली पुढील यादी स्क्रिनवर दाखविण्यात आली.
अनुसूचित जाती सर्वसाधारण - कवठी, आकापूर, सामदा बुज
अनुसूचित जाती स्त्री राखीव - अंतरगाव, चिचबोडी, निमगाव
अनुसूचित जमाती सर्वसाधारण - पारडी, वाघोली बुटी, निफंद्रा, थेरगाव
अनुसूचित जमाती स्त्री राखीव - बेलगाव, जिबगाव, व्याहाड बुज, मोखाळा,
नागरिकांचा मागास प्रवर्ग - पेंढरी मक्ता, गेवरा बुज, पाथरी, डोनाळा, बोथली, उसेगाव
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव - सायखेडा, मेहा बुज, जांब बुज, करोली, उपरी, लोंढोली, व्याहाड खुर्द
सर्वसाधारण स्त्री राखीव - डोंगरगाव, बोरमाळा, खेडी, चांदली, चारगाव, गायडोंगरी, कढोली, निलसनी पेठगाव, विहीरगाव, मुंडाळा, गेवरा खुर्द, करगाव, साखरी
सर्वसाधारण - चकपीरंजी, नवेगाव तुकूम, हिरापूर, केरोडा, मंगरमेंढा, कापसी, घोडेवाही, हरंबा, कोंडेखल, सोनापूर, कसरगाव, पालेबारसा, उसरपार चक, चिखली
मागील आरक्षणात बदल झालेली ग्रामपंचायती - खेडी (नामाप्र महिला वरून सर्वसाधारण महिला ) चकपीरंजी (नामाप्र वरून सर्वसाधारण) गेवरा बुज (नामाप्र महिला वरून नामाप्र ) व्याहाड खुर्द (नामाप्र वरून नामाप्र महिला) मुंडाळा (नामाप्र वरून नामाप्र महिला)
वरील आरक्षणाची यादी कोणत्या आधारावर बनविण्यात आली हे मात्र उपस्थितांना कळलेच नाही.
आरक्षण सोडत पद्धत नियमबाह्य -
आरक्षण सोडत काढत असतांना ग्रामपंचायत मधील आरक्षण चक्राकार पद्धतीने काढल्या जाते. आरक्षण द्यायचे ग्रामपंचायत जास्त व जागा कमी असल्यास चिठ्या टाकून आरक्षण निश्चित केल्या जाते मात्र सभेत उपस्थित लोकांमध्ये चिठ्या टाकून आरक्षण निश्चित केलेले नाही. तहसीलदार यांनी तयार करुन आणलेली यादीच दाखवील्याने आरक्षण सोडत पारदर्शकपणे पार पडली नसल्याचा आरोप होत आहे. या सोडतीबाबत काही जागरूक नागरिक तहसील कार्यालयात आक्षेप अर्ज दाखल करण्यास गेले असता तहसीलदार यांचे आक्षेप न स्वीकारण्याचे आदेश असल्याने अधिकारी कर्मचारी यांनी आक्षेप स्वीकारले नाही. नेहमीप्रमाणे तहसीलदार यांचा मनमानी कारभार नागरिकांच्या लक्षात आला. त्यामुळे ई-मेलद्वारे तहसीलदार व जिल्हाधिकारी यांचेकडे आक्षेप दाखल केला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!