मयुरी सुपारे आत्महत्या प्रकरणाला नवे वळण; फरार डॉक्टर विष्णू महानंद विश्वास बंगालमधून अटकेत

शेगाव पोलिसांची कारवाई; न्यायालयाने दिला तीन दिवसांचा पोलीस कोठडीचा आदेश

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या साखरा-वडगाव परिसरात मयुरी हरिदास सुपारे या महिलेने आत्महत्या केल्याची घटना २ ऑगस्ट रोजी घडली होती. या प्रकरणाच्या तपासाला वेग देत शेगाव पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. तपासादरम्यान प्रकरणातील दोन आरोपींना शिर्डी व शेगाव येथून अटक करण्यात पोलिसांना यापूर्वीच यश आले होते.

मात्र, या प्रकरणातील फरार असलेला डॉक्टर विष्णू महानंद विश्वास हा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच त्याने प्रकरणातून दिलासा मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. मात्र, न्यायालयाकडून त्याला दिलासा न मिळाल्याने पोलिसांचा त्याचा शोध घेण्याचा मार्ग मोकळा झाला.

यानंतर शेगाव पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत फरार डॉक्टर विष्णू महानंद विश्वास याचा शोध घेतला. अखेर रविवारी बंगालमधून त्याला ताब्यात घेण्यात शेगाव पोलिसांना यश आले. शेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

अटक केलेल्या डॉक्टरला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी (PCR) सुनावली असून पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहेत.

या प्रकरणातील सर्व आरोपींची भूमिका, मयुरी सुपारे यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण आणि गर्भपाताशी संबंधित बाबींचा तपास पोलीस करीत आहेत. त्यामुळे निष्पक्ष तपासातून सत्य समोर येऊन मयुरी सुपारे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे मयुरी सुपारे आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले असून, पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!