दहावी नापास झाला... एका हजार रुपयांत सुरुवात केली; ५६ वर्षांनंतरही ‘तो’ थांबलेला नाही!

पाच पैशांच्या पानापासून ५६ वर्षांची अविरत वाटचाल!

मूलच्या बदलत्या इतिहासाचा साक्षीदार ‘रमेश पान सेंटर’; ७२व्या वर्षीही चेहऱ्यावर हास्य अन् हातात लज्जतदार पान



मूल : विजय सिद्धावार 

दहावी नापास झाल्यानंतर आता पुढे काय करायचे, हा प्रश्न एका १७ वर्षांच्या तरुणासमोर उभा होता. शिक्षणाची वाट थांबली, पण आयुष्याची वाट थांबलेली नव्हती. त्याच वेळी त्याला आपल्या घराण्याच्या पारंपरिक व्यवसायाची आठवण झाली—विड्याच्या पानाची.

खिशात होते अवघे एक हजार रुपये. त्यातून १९७० साली मूल पोलीस ठाण्याच्या बाजूला, नहराच्या काठावर एक छोटासा पानठेला उभा राहिला. त्या दिवसापासून सुरू झालेली ही व्यवसायाची वाटचाल तब्बल ५६ वर्षे अखंड सुरू आहे. आज वयाच्या ७२व्या वर्षीही चेहऱ्यावर तेच हास्य, हातात पान लावण्याची तीच सफाई आणि ग्राहकांशी संवाद साधण्याचा तोच उत्साह कायम आहे.

हे नाव आहे रमेश सिरसकर. गांधी चौकातील ‘रमेश पान सेंटर’ हे केवळ पानाचे दुकान राहिलेले नाही; ते मूल शहराच्या बदलत्या काळाचे एक जिवंत स्मृतिचिन्ह बनले आहे.

पाच पैशांपासून दहा-पंधरा रुपयांपर्यंतचा प्रवास

१९७० मध्ये रमेश सिरसकर यांनी पानाचा व्यवसाय सुरू केला, तेव्हा एका पानाची किंमत होती अवघी पाच पैसे. पुढे दहा पैसे, पंधरा पैसे असा प्रवास करत आज साध्या पानाची किंमत दहा ते पंधरा रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

त्या काळातील पानाची चवही वेगळी होती. चमन, सोप, सुपारी, खोबऱ्याचा कीस, गुलकंद अशा साहित्यापासून मसाला पान तयार होत असे. सुरती, सातारी, केशरी आदी तंबाखूचे प्रकारही ग्राहकांच्या आवडीनुसार वापरले जात. आज सर्वत्र परिचित असलेला ‘खर्रा’ मात्र त्या काळात नव्हता.

त्या काळात सुपारीचा भाव साधारण १८ रुपये किलो, तर सोप दहा-बारा रुपये किलो असल्याची आठवण सिरसकर सांगतात. घरी ठोक पान विक्रीचाही व्यवसाय केला जात असे.

पानठेल्यानेही पाहिला मूलचा बदलता चेहरा

रमेश सिरसकर यांनी पानाचा व्यवसाय सुरू केला, त्या काळात मूल शहरात पानठेले ही एक वेगळीच ओळख होती. भगवान भिमनवार, कवडू राहुलवार, मोहन आयलानी, नरुले, ठेंगेराव, सत्यवान मेश्राम, सुधाकर तालेवार यांच्यासह अनेकांचे पानठेले शहरात होते.

काळ बदलला. अनेक व्यवसाय बंद झाले, काही ठिकाणे बदलली; मात्र १९७० मध्ये सुरू झालेले रमेश पान सेंटर आजही त्याच उत्साहाने सुरू आहे.

सुरुवातीला पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या नहराच्या काठावर हा पानठेला उभा राहिला. काही काळानंतर तो तत्कालीन विलास समर्थ यांच्या अंगणात हलविण्यात आला. पुढे रमेश यांनी हा व्यवसाय आपले बंधू सुरेश यांच्याकडे सोपवला आणि गांधी चौकातील शंकर चेपूरवार यांच्या हॉटेल परिसरात स्वतःचा प्रशस्त पानठेला सुरू केला.

पानठेला की राजकीय कट्टा?

आजच्या सोशल मीडियाच्या आणि मोबाईलच्या युगात राजकीय चर्चा कुठेही सुरू होतात. मात्र काही दशकांपूर्वी अशा चर्चांसाठी पानठेले हीच महत्त्वाची ठिकाणे होती.

रमेश सिरसकर यांच्या पानठेल्यावर मूल शहरातील अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिक येत. पानाचा आस्वाद घेत घेत शहरातील राजकारण, विकास, निवडणुका आणि विविध प्रश्नांवर तासन् तास चर्चा रंगत.

त्यामुळे ‘रमेश पान सेंटर’ हे एका अर्थाने मूलच्या राजकीय चर्चेचे अनौपचारिक केंद्रच बनले होते.

याच चर्चांच्या वातावरणातून रमेश सिरसकर यांनाही राजकारणाची आवड निर्माण झाली. मूल नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवली आणि पहिल्याच प्रयत्नात नगरसेवक म्हणून निवडून आले.

राजकारणात यश मिळाले, पद मिळाले; मात्र त्याचा गर्व त्यांनी व्यवसायावर होऊ दिला नाही. नगरसेवक झाल्यानंतरही त्यांनी पानाचा व्यवसाय सोडला नाही. पानठेला आणि राजकारण या दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी आपल्या परीने सांभाळल्या.

मोठ्या नेत्यांच्या आवडीचे पान

मूल परिसरात आले की अनेक मोठे राजकीय नेते रमेश सिरसकर यांच्या हातचे पान आवर्जून खात असत, अशी आठवण ते अभिमानाने सांगतात.

माजी केंद्रीय अर्थमंत्री शांतारामजी पोटदुखे, माजी मंत्री वामनराव गड्डमवार आणि माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या हातचे पान खाल्ले आहे. अनेकजण पानाचे पार्सलही सोबत घेऊन जात असत, अशी त्यांची आठवण आहे.

आजही या आठवणी सांगताना रमेश सिरसकर यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटते.

पानासोबत संगीताचाही खजिना

पूर्वीचा पानठेला म्हणजे केवळ पान विकण्याची जागा नव्हती. तिथे संगीतही असायचे. गाण्यांच्या तबकड्या, नंतर कॅसेट आणि मडक्यात तयार केलेली साऊंड सिस्टीम—दिवसभर हिंदी चित्रपटांतील सदाबहार गाणी वाजत असत.

रमेश पान सेंटरवरही संगीताची अशीच व्यवस्था होती. पानाचा सुगंध आणि पार्श्वभूमीवर वाजणारी जुन्या हिंदी चित्रपटांतील गाणी, हा त्या काळातील मूलच्या बाजारपेठेचा एक वेगळाच अनुभव होता.

बारई समाजाच्या परंपरेशी जोडलेला व्यवसाय

रमेश सिरसकर हे बारई समाजाचे. विड्याच्या पानाची लागवड आणि विक्री हा या समाजाचा पारंपरिक व्यवसाय.

मूल तालुक्यातील राजगड येथे बारई समाजाचे पानाचे मळे होते  असे ते सांगतात. याशिवाय चिमूर, ब्रह्मपुरी, भद्रावती आणि शेगाव परिसरातही पानाचे मळे होते याची माहिती आठवणीने सांगतात.

त्यामुळे त्यांच्या पानाच्या व्यवसायामागे केवळ उपजीविकेची गरज नव्हती, तर पिढ्यान्‌पिढ्यांच्या परंपरेचा धागाही जोडलेला होता.

‘तेज पान’चा एक गमतीदार किस्सा

रमेश सिरसकर यांच्या स्मरणात आजही एक मजेशीर प्रसंग आहे.

एकदा मूल शहरात सीआरपीएफची टीम आली होती. जवानांनी त्यांना ‘तेज पान’ लावण्यास सांगितले. त्या काळी मूलमध्ये ‘तेज पान’ म्हणजे तुलनेने जास्त चुना लावलेले पान, अशी ओळख होती. मात्र सीआरपीएफचे जवान ज्या भागातून आले होते, त्या भागात ‘तेज पान’ हा एका विशिष्ट प्रकारच्या तंबाखूसाठी वापरला जाणारा शब्द होता.

रमेश यांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे जास्त चुना लावलेले पान तयार करून दिले. ते पान खाल्ल्यानंतर जवानांनी दिलेल्या प्रतिक्रिया आठवताना आजही रमेश सिरसकर खळखळून हसतात. ‘शब्द एकच; पण अर्थ वेगळा!’ या गैरसमजाचा हा किस्सा त्यांच्या ५६ वर्षांच्या व्यवसायातील गमतीदार आठवणींपैकी एक आहे.

अपघाताची आठवणही आज ताजी

मूल शहरातील जुन्या रेल्वे मार्गावरील फाटकावर एचडी गाडीने झालेला त्यांचा अपघात त्याकाळी शहरात चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरला होता. व्यवसाय, राजकारण आणि शहरातील दैनंदिन जीवनातील असंख्य घटना पाहत त्यांनी काळ पुढे जाताना अनुभवला.

शहर बदलले; काळ बदलला; पण रमेश पान सेंटर कायम

१९७० मध्ये मूलचे रूप वेगळे होते. बाजारपेठ वेगळी होती, माणसांमधील संवाद वेगळा होता, पानाची चव वेगळी होती आणि पानठेल्यांभोवती जमणाऱ्या गप्पाही वेगळ्या होत्या.

आज मोबाईलच्या पडद्यावर संवाद सुरू होतात. सोशल मीडियावर राजकीय चर्चा रंगतात. पानाचे दर पाच पैशांपासून दहा-पंधरा रुपयांवर पोहोचले. पानाच्या प्रकारांत बदल झाला. शहराचा चेहराही बदलला.

पण या बदलांचा साक्षीदार म्हणून गांधी चौकातील रमेश पान सेंटर आजही उभे आहे.

१७ वर्षांचा तरुण म्हणून व्यवसाय सुरू करणारे रमेश सिरसकर आज ७२ वर्षांचे आहेत. मात्र त्यांच्या उत्साहात आजही त्या १७ वर्षांच्या तरुणाचीच झलक दिसते.

‘अखेरपर्यंत हाच व्यवसाय करणार. याच व्यवसायाने मला समाधान दिले,’ असे ते सांगतात.

मूलच्या इतिहासाची पाने लिहिताना कदाचित मोठ्या इमारती, राजकीय घटना आणि महत्त्वाच्या व्यक्तींचा उल्लेख केला जाईल. पण शहराचा खरा इतिहास हा अशाच छोट्या जागांमध्ये, साध्या माणसांच्या आठवणींमध्ये आणि पिढ्यान्‌पिढ्या सुरू राहिलेल्या व्यवसायांमध्येही दडलेला असतो.

रमेश पान सेंटरची ५६ वर्षांची कहाणी ही अशाच एका माणसाची नव्हे, तर बदलत्या मूल शहराची जिवंत कहाणी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!