नेताजी वॉर्डातील अंगणवाडी क्रमांक ४ व ११ मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

सावित्रीबाई फुले यांना अभिवादन; बालगोपालांनी शिक्षक व राधा-कृष्णाची वेशभूषा साकारत जिंकली मने

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे शिक्षक दिन मोठया उत्साहपूर्व वातावरणात साजरा करण्यात आला. शिक्षक हा समाज घडविणारा शिल्पकार असून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करत असतो. भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा शिक्षक दिन हा शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. याच औचित्याने चिमूर शहरातील नेताजी वॉर्ड येथील अंगणवाडी क्रमांक ४ व अंगणवाडी क्रमांक ११ मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला लोकप्रतिनिधींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचून समाजात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली. त्यांच्या कार्याचा आदर्श बालगोपालांसमोर ठेवत शिक्षणाचे महत्त्व उपस्थितांना सांगण्यात आले.
यावेळी अंगणवाडीतील चिमुकल्या बालगोपालांनी विविध आकर्षक वेशभूषा साकारून कार्यक्रमात रंगत आणली. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वेशभूषा करून वर्गातील अध्यापनाचे सादरीकरण केले, तर काहींनी राधा-कृष्णाच्या पारंपरिक वेशभूषेत उपस्थितांची मने जिंकली. चिमुकल्यांच्या निरागस अभिनयाने उपस्थित पालक आणि नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिक्षकांचा सन्मान आणि चांगले संस्कार याविषयी थोडक्यात मार्गदर्शन करण्यात आले. लहान वयातच शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, आत्मविश्वास वाढावा आणि संस्कारक्षम पिढी घडावी, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
या प्रसंगी प्रभाग क्रमांक ५ च्या नगरसेविका वनिता मगरे, अंगणवाडी क्रमांक ४ च्या सेविका लता मुरकुटे, मदतनीस प्रिया मेश्राम, अंगणवाडी क्रमांक ११ च्या सेविका सविता जांभुळकर, मदतनीस शोभा गोडे, पालक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम बालगोपालांसाठी प्रेरणादायी ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!