नागपूर रोडवरील बांधकामाला नगर परिषदेची परवानगी; प्रशांत समर्थ यांचा खुलासा
नागपूर रोडवरील बांधकामाला नगर परिषदेची परवानगी; प्रशांत समर्थ यांचा खुलासा
मूल : ‘नोटीस केराच्या टोपलीत; मूलमध्ये अतिक्रमणाची स्पीड वाढली’ या मथळ्याखाली पब्लिक पंचनामाने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या अनुषंगाने मूल नगर परिषदेचे बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी आपला खुलासा केला आहे. नागपूर रोडवरील संबंधित बांधकाम अधिकृत असून, त्यासाठी नगर परिषदेकडून आवश्यक त्या परवानग्या नियमानुसार घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या संदर्भातील आवश्यक परवानगी व संबंधित कागदपत्रे प्रशांत समर्थ यांनी पब्लिक पंचनामाकडे उपलब्ध करून दिली आहेत. उपलब्ध कागदपत्रांची पाहणी करता, नागपूर रोडवरील सदर बांधकामासाठी नगर परिषदेकडून कायदेशीर परवानगी घेण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
दरम्यान, या बांधकामासंदर्भात संबंधितांना नगर परिषदेकडून कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नसल्याचेही प्रशांत समर्थ यांनी पब्लिक पंचनामाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. त्यामुळे या बांधकामाला अतिक्रमण ठरविण्याबाबतच्या चर्चेवर त्यांनी कागदपत्रांच्या आधारे स्पष्टीकरण दिले आहे.
पब्लिक पंचनामाने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा उद्देश शहरातील अतिक्रमणाच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे आणि नागरिकांचे लक्ष वेधणे हा होता. संबंधितांकडून अधिकृत कागदपत्रांसह खुलासा प्राप्त झाल्यानंतर त्याची दखल घेऊन वस्तुस्थिती वाचकांसमोर मांडण्यात येत आहे.
कागदपत्रांच्या आधारे वस्तुस्थिती स्पष्ट
नागपूर रोडवरील या विशिष्ट बांधकामाबाबत उपलब्ध कागदपत्रांनुसार बांधकामास नगर परिषदेची परवानगी असल्याचे दिसून येत असल्याने, सदर बांधकामाबाबत ‘अधिकृत परवानगी आहे की नाही’ हा प्रश्न सध्या स्पष्ट झालेला आहे. मात्र, शहरातील इतर अतिक्रमणांबाबत प्रशासनाने काय कारवाई केली किंवा करणार आहे, हा स्वतंत्र प्रशासकीय विषय आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!