लाडक्या कंत्राटदारासाठी’ मूलकरांच्या आरोग्याचा बळी?

डेंग्यूचा बळी गेला; तरीही प्रशासन झोपेत!
मूल शहरात डासांचा कहर; अडीच महिने उलटले तरी ना नालीसफाई, ना औषधी फवारणी!
कंत्राटदाराचे लाड पुरविताना मूलकरांच्या आरोग्याशी खेळ?


मूल : प्रतिनिधी
मूल शहरात एका युवकाचा डेंग्यूमुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली असून, या घटनेने नगरपरिषदेच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला असतानाही शहरातील अनेक भागांत नालीसफाई झालेली नसल्याचे नगरसेवकांकडूनच सांगितले जात आहे. त्यातच डास प्रतिबंधक औषधी फवारणीही झालेली नसल्याने शहरात डासांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे.
घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटातील तरतुदीनुसार नालीसफाई आणि औषधी फवारणीची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची आहे. मात्र, कंत्राटदाराकडून ही कामे केली जात नसल्याचे समोर येत असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

आरोग्य सभापतींनी चूक मान्य केली मान्य केली; मग कारवाई कधी?
नगरपरिषदेचे आरोग्य सभापती राकेश रत्नावार यांनी औषधी फवारणीची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदाराची असल्याचे मान्य केले आहे. संबंधित कंत्राटदाराने औषधी फवारणी केली नसल्याचेही त्यांनी मान्य केले असून, नगर परिषद संबंधित कंत्राटदारावर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
मात्र, “पावसाचे वातावरण असल्याने औषधी फवारणी करता येत नाही,” अशी माहिती राकेश रत्नावार यांनी ‘पब्लिक पंचनामा’शी बोलताना दिली. त्यावर आजपर्यंत वातावरण कोरडे होते, जून महिन्यात पावसाळापूर्वी फवारणी करता आली असती याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी नगर परिषदेची चूक झाल्याचे मान्य केले.
डासांचा प्रादुर्भाव पावसाळ्यातच सर्वाधिक वाढत असताना फवारणी पावसाचे वातावरण संपल्यानंतर करण्याचा निर्णय कितपत योग्य आहे? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
मान्सूनपूर्व नालीसफाई कुठे गायब?
जूनमध्ये मान्सून सुरू होण्यापूर्वीच शहरातील नाले साफ करून औषधी फवारणी करणे अपेक्षित होते. मात्र, पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी अनेक नाल्यांची सफाई झालेली नसल्याचे नगरसेवकांनी मान्य केले आहे.
नालीसफाई करण्यासाठी नगरसेवकांनी नगर परिषदेला पत्रे दिल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, या पत्रांची मुख्याधिकारी यांनी दखल घेतली नसल्याचे आरोप होत आहेत.
लोकप्रतिनिधींच्या पत्रांकडेच दुर्लक्ष होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या तक्रारींची दखल कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आमदारांनी दिलेल्या फॉगिंग मशीन धूळ खातायत?
मूल शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी डासांच्या प्रादुर्भावावर धूर फवारणी करण्यासाठी फॉगिंग मशीन नगरपरिषदेला उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत असताना या मशीनचा वापर होत नसल्याने त्या मशीनचे काय झाले, असा सवाल उपस्थित झाला आहे.
भाजपाचे हितचिंतक किशोर कापगाते यांनी समाज माध्यमावर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
किशोर कापगाते यांची समाज माध्यमावरील प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.
“सुधीरभाऊ यांनी डास प्रादुर्भावावर धूर फवारणीसाठी गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या, त्या नगर परिषद मध्ये उपलब्ध आहेत, शहरात खूप डास वाढले आहेत, कालच शहरात डेंग्यू मुळे युवकाचा मृत्यू झाला, अजून कुणी निष्पाप व्यक्तींचा बळी जाण्यापूर्वी प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे”
कंत्राटदाराचे लाड की नागरिकांच्या आरोग्याची काळजी?
घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदारावर नालीसफाई आणि औषधी फवारणीची जबाबदारी असताना कंत्राटातील कामे वेळेत का करून घेतली गेली नाहीत? कंत्राटदाराकडून काम होत नसल्याचे मान्य झाल्यानंतरही कारवाईसाठी विलंब का?
पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले. डासांचा प्रादुर्भाव वाढला. एका युवकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. तरीही फवारणी पावसाळा संपल्यानंतर होणार असेल, तर प्रशासन नेमके कोणाची वाट पाहत आहे?
कंत्राटदाराचे लाड पुरविण्याची किंमत आता मूल शहरातील नागरिकांना त्यांच्या आरोग्याच्या रूपाने मोजावी लागत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
डेंग्यूने युवकाचा जीव गेला; आता तरी प्रशासन जागे होणार? की ‘लाडक्या कंत्राटदाराच्या’ लाडासाठी मूलकरांच्या आरोग्याची आणखी परीक्षा घेतली जाणार? असा सवाल नागरिक करीत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!