जांभुळघाटमध्ये जंगली कोल्ह्याचा थरारक हल्ला

दोन नागरिक जखमी; ग्रामस्थांनी कोल्ह्याला ठार करून केली सुटका

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर तालुक्यातील मौजा जांभुळघाट येथे जंगली कोल्ह्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले असून, ग्रामस्थांनी वेळीच धाव घेत कोल्ह्याला ठार करून दोन्ही जखमींची सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, जांभुळघाट येथील कवडू वामन तरारे (वय ६५) आणि हर्षल महेश गंडेधा (वय ३१) हे दोघेही जांभूळघाट येथील रहिवासी असून सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास गावातून पायी जात होते. यावेळी मधुवन विद्यालयासमोर अचानक जंगली कोल्ह्याने त्यांच्यावर हल्ला केला.

कोल्ह्याने दोन्ही नागरिकांना चावा घेतल्याने ते जखमी झाले. कोल्हा त्यांना सोडत नसल्याचे पाहून दोघांनी आरडाओरड केली. आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. कोल्ह्याचा हल्ला सुरूच असल्याने ग्रामस्थांनी त्याला ठार करून दोन्ही नागरिकांची सुटका केली.

जखमी दोन्ही नागरिकांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, जांभुळघाट येथे दाखल करण्यात आले.

गावात येऊन जंगली प्राण्याने नागरिकांवर हल्ला करण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन गाव परिसरातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जांभुळघाट येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!