सफाई कामगारांच्या आंदोलनाला भारती राखडे यांचा पाठिंबा
किमान वेतनासाठीच्या सफाई कामगारांच्या आंदोलनाला भारती राखडे यांचा पाठिंबा
आंदोलन मंडपाला भेट देत कामगारांच्या मागण्या जाणून घेतल्या; किमान वेतनासह पीएफच्या हिशोबाची मागणी
मूल : मूल नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदाराकडे कार्यरत सफाई कामगारांनी किमान वेतनासह विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या बेमुदत उपोषण व काम बंद आंदोलनाला शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख भारती राखडे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
राखडे यांनी आंदोलन मंडपाला भेट देत उपोषणकर्त्या सफाई कामगारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कामगारांच्या मागण्या जाणून घेत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. किमान वेतन मिळावे, तसेच वेतनातून भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम कपात केली जात असताना त्या रकमेचा योग्य हिशोब व माहिती कामगारांना देण्यात यावी, या मागण्यांबाबत त्यांनी कामगारांशी चर्चा केली.
घनकचरा व्यवस्थापनाचे काम खाजगी कंत्राटदारामार्फत केले जात असताना कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये. कामगारांना शासन नियमानुसार किमान वेतन मिळणे हा त्यांचा हक्क आहे. तसेच त्यांच्या वेतनातून कपात होणाऱ्या पीएफच्या रकमेबाबत पारदर्शकता असणे आवश्यक असल्याचे राखडे यांनी यावेळी सांगितले.
“कामगार आपल्या हक्कासाठी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या न्याय्य मागण्यांचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने तोडगा काढावा,” अशी भूमिका भारती राखडे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सफाई कामगारांच्या आंदोलनाला विविध सामाजिक संस्था, कामगार संघटना आणि नागरिकांकडून पाठिंबा मिळत असून, आंदोलनाचा प्रश्न दिवसेंदिवस व्यापक होत आहे. नगरपरिषद प्रशासन आता कामगारांच्या मागण्यांवर काय तोडगा काढते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!