चिंचाळा येथे चंद्रपूर तालुका राज्य शासकीय कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेची वार्षिक सभा उत्साहात

सभासदांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे; अतिक्रमण निर्मूलनासह संस्थेच्या विकासावर सखोल मार्गदर्शन

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - गत ३३ वर्षांपासून सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या चंद्रपूर तालुका राज्य शासकीय कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी चिंचाळा येथील सांस्कृतिक सभागृह, खुजे नगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

चंद्रपूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण गृहनिर्माण संस्थांपैकी एक असलेल्या या संस्थेची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातील कामगार-कर्मचाऱ्यांचे झुंजार नेते र. ग. कर्णिक यांच्या हस्ते रोवण्यात आली होती. संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेताना सभासदांनी संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

सभेच्या प्रारंभी उपस्थित संचालक मंडळाच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मागील वर्षभरात निधन पावलेल्या संस्थेच्या सभासदांसह समाजातील मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेतील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संस्थेच्या कामकाजाबाबत सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध शंका, प्रश्न व समस्यांवर अध्यक्ष, सचिव तसेच संचालक मंडळाने सविस्तर माहिती देत समाधानकारक निरसन केले. त्यामुळे संस्थेच्या सेवा व सुविधांबाबत सभासदांनी समाधान व्यक्त केले.

संस्थेचे अध्यक्ष प्रदीप उमरे यांनी संस्थेतील आर्थिक व्यवहार, खाते, ठेवी तसेच कर्ज व्यवहारांबाबत सभासदांना सविस्तर माहिती दिली. संस्थेच्या सर्व सभासदांना सोबत घेऊन आगामी काळात संस्थेच्या विकासाचा आलेख आणखी उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा दुर्दम्य आशावाद त्यांनी व्यक्त केला.

संस्थेचे सचिव प्रमोदजी बेहरम यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेतील विविध विषय, संस्थेचे कामकाज आणि आगामी नियोजनाबाबत सभासदांना माहिती दिली.

अतिक्रमणाच्या प्रश्नावर कायदेशीर कारवाईचे मार्गदर्शन

सभेचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे मुख्य प्रवर्तक व संस्थापक अध्यक्ष श्री. वामनरावजी कुचनकर उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या जागेवरील तसेच रस्त्यावरील अतिक्रमणाचा संवेदनशील विषय उपस्थित करून त्यावर सखोल मार्गदर्शन केले.

सहकार अधिनियमांच्या अधीन राहून संस्थेच्या आदर्श उपविधीची प्रभावी अंमलबजावणी करणे, संस्थेच्या मालमत्तेचे संरक्षण करणे आणि अतिक्रमणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर व कठोर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संस्थेच्या मालमत्तेचे हित अबाधित ठेवण्यासाठी सभासदांनीही एकजुटीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

संस्थेच्या पुढील वाटचालीत सभासदांच्या सहकार्याने पारदर्शक कारभार, उपलब्ध सेवा-सुविधांचा विस्तार आणि संस्थेच्या मालमत्तेचे संरक्षण यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सभेच्या समारोपप्रसंगी माजी अध्यक्ष मधुकरजी आकुलवार यांनी आभार प्रदर्शन केले, तर माजी संचालक वामनरावजी जुनघरे यांनी सभेचे प्रभावी संचालन केले.

वार्षिक सर्वसाधारण सभेला संस्थेचे सभासद, संचालक मंडळ तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!