९ महिन्यांच्या दिरंगाईनंतर प्रशासनाला अल्टिमेटम; सोमवारपर्यंत निर्णय नाही तर ठिय्या
मूल | प्रतिनिधी
मूल शहरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौकाच्या सुशोभीकरणाचे काम तब्बल नऊ महिन्यांपासून रखडून ठेवण्यात आल्याचा आरोप पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. समाजातील विविध संघटना आणि नागरिक एकवटू लागल्याचे चित्र दिसताच नगर परिषद प्रशासनाने पुतळ्याची घोषणा करून मूळ प्रश्नावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण मोहूर्ले यांनी केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, या चौकाच्या सुशोभीकरणासाठी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या स्थानिक विकास निधीतून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. संबंधित कामाचे वर्क ऑर्डर सुमारे नऊ महिन्यांपूर्वी काढण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली जागा कंत्राटदाराला अद्यापही मोजून देण्यात आली नसल्याचा आरोप आहे.
मोहूर्ले यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासकीय कारकिर्दीत तसेच नवीन नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतरही अनेकवेळा पाठपुरावा करूनही प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे मंजूर काम रखडले असून, यामागे कोणाचा वैयक्तिक स्वार्थ आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, भाजपकडून सातत्याने पाठपुरावा सुरू असतानाच सामाजिक कार्यकर्ते राकेश मोहूर्ले यांनी उपोषणाचा इशारा दिला. त्यानंतर समता परिषदेच्या शिष्टमंडळानेही प्रशासनाची भेट घेतली. या घडामोडीनंतर नगराध्यक्षांनी चौकात पुतळा उभारण्याची घोषणा केली. मात्र, प्रथम मंजूर झालेले सुशोभीकरणाचे काम पूर्ण करा, त्यानंतर नवीन घोषणा करा, अशी भूमिका प्रवीण मोहूर्ले यांनी घेतली आहे.
त्यांनी नगराध्यक्षांना सवाल करत, "सात महिन्यांपासून वारंवार मागणी होऊनही जागा का देण्यात आली नाही? समाज एकत्र येत असल्याचे दिसताच अचानक पुतळ्याची घोषणा करण्याची वेळ का आली?" असा प्रश्न उपस्थित केला आहे.
सोमवारपर्यंत अल्टिमेटम
सुशोभीकरणासाठी आवश्यक जागा येणाऱ्या सोमवारपर्यंत मोजून देण्यात आली नाही, तर नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण मोहूर्ले यांनी दिला आहे.
यामुळे नऊ महिन्यांपासून रखडलेल्या फुले चौक सुशोभीकरणाच्या कामाबाबत प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!