अखेर नगर परिषद प्रशासन नमले! ९ महिन्यांपासून रखडलेले फुले चौक सौंदर्यीकरण; आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग


सोमवारपर्यंत जागा मोजून न दिल्यास नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन – प्रवीण मोहूर्ले
मूल | प्रतिनिधी
वंदनीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी आमदार सुधीरभाऊ यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या २५ लाख रुपयांच्या कामाला तब्बल नऊ महिने उलटूनही प्रत्यक्ष सुरुवात न झाल्याने नगर परिषद प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कामाचे वर्क ऑर्डर पूर्वीच देण्यात आले असतानाही संबंधित कंत्राटदाराला जागा मोजून न दिल्याने काम रखडल्याचा आरोप होत आहे.
भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण मोहूर्ले यांनी प्रशासनावर निशाणा साधत सांगितले की, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना वारंवार मागणी करूनही जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही. सामाजिक कार्यकर्ते राकेश मोहूर्ले यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर तसेच समाजबांधव एकवटू लागल्यानंतर प्रशासनाने स्वतःची बाजू सावरण्यासाठी पुतळा उभारण्याची घोषणा केल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रवीण मोहूर्ले यांनी नगराध्यक्षांना प्रश्न विचारत, "पदभार स्वीकारून सात महिने झाले, तरी सौंदर्यीकरणासाठी जागा का देण्यात आली नाही? आता समाजाच्या रोषानंतरच पुतळ्याची घोषणा का करण्यात आली?" असा सवाल उपस्थित केला. आधी मंजूर झालेले आणि नऊ महिन्यांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण करावे, त्यानंतर इतर घोषणा कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
यासंदर्भात त्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, येणाऱ्या सोमवारपर्यंत सौंदर्यीकरणाच्या कामासाठी जागा मोजून देण्यात आली नाही, तर नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
– प्रवीण मोहूर्ले
शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, मूल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!