गदगाव येथे दुर्दैवी घटना : विजेचा प्रहार होऊन १९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू
गाई चारण्यासाठी गेलेल्या कुमार सुहास काळे यांचेवर काळाचा घाला; परिसरात शोककळा
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील गदगाव येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेत विजेचा प्रहार होऊन १९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गदगाव गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुमार सुहास जयेंद्र काळे (वय १९ वर्षे) हा गुरुवारी दुपारी सुमारे १ ते २ वाजताच्या दरम्यान गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील गदगाव मार्गावर गाई चराईसाठी घेऊन गेला होता. त्यावेळी अचानक पावसासह मेघगर्जना सुरू झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी सुहास हा जवळील झाडाखाली उभा राहिला. मात्र त्याचवेळी अचानक कडकडाटासह वीज झाडावर कोसळली आणि तिचा जोरदार प्रहार सुहास यांच्या अंगावर झाला. या भीषण घटनेत त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. युवकाला तातडीने चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला.
या घटनेची नोंद चिमूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
सध्या पावसाळ्यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट वाढत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मेघगर्जना सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात उभे राहणे टाळावे तसेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गदगाव येथील या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून एका होतकरू युवकाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!