आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकासकामाला नगर परिषदेकडून ब्रेक!

आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकासकामाला नगर परिषदेकडून ब्रेक!
२५ लाखांच्या फुले चौक सुशोभीकरणाचे काम रखडले; सुधारकांच्या नावाची नगर परिषदेला 'ॲलर्जी' का?


मूल | प्रतिनिधी
मूल शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आणि आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मंजूर झालेल्या ₹२५ लाखांच्या फुले चौक सुशोभीकरण प्रकल्पाला नगर परिषदेच्या दिरंगाईमुळे ब्रेक लागल्याची चर्चा शहरात रंगली आहे. निधी उपलब्ध असतानाही काम सुरू होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने असलेल्या चौकाच्या सुशोभीकरणासाठी आवश्यक जागेचे सीमांकन करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) नगर परिषदेला वारंवार पत्रव्यवहार करून जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. तरीही नगर परिषदेकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचे समोर आले आहे.
माळी समाजातील प्रतिष्ठित नगरसेवक तुकाराम गुरनुले, सामाजिक कार्यकर्ते राकेश मोहुर्ले यांनी या संदर्भात आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भेट घेऊन काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदार मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. मात्र त्यानंतरही आठवडाभर उलटून गेला असला तरी नगर परिषद या विषयावर गंभीर असल्याचे दिसून येत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
फुले चौक हा शहरातील प्रमुख चौक असून, त्याचे सुशोभीकरण झाल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच महात्मा फुले यांच्या कार्याला अभिवादन करणारे स्मरणस्थळ उभे राहणार आहे. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हा महत्त्वाचा प्रकल्प अद्यापही रखडलेला आहे.
नगर परिषदेच्या या भूमिकेमुळे "समाजसुधारकांच्या नावाच्या विकासकामांबाबत नगर परिषद उदासीन आहे का?" असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. शहरातील विविध विकासकामांमध्ये होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर फुले चौकाचा विषयही आता चर्चेचा मुद्दा बनला असून, नगर परिषदेने तातडीने सीमांकन करून सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!