रोड बांधकाम ठेकेदारच्या चुकीच्या नियोजनाचा प्रवाशांना फटका
मागील आठवडाभरापासून शेगाव ते चंदनखेडा मुधोली मार्गे बस सेवा बंद
शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - शेगाव बु वरून चंदनखेडा मुधोली मोहरली या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम मागील अनेक दिवसापासून सुरू असून रोड बांधकाम ठेकेदारी चुकीच्या नियोजनाच्या फटका वाहनधारकासहित प्रवाशांना बसत आहे.या रस्त्याचा ठेका यादव कंट्रक्शन वर्धा यांना मिळाला असून.मागील सहा महिने आदी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, चंद्रपूर वणी, आर्णी क्षेत्राचे खासदार, वरोरा भद्रावती क्षेत्राचे आमदार यांच्या उपस्थितीत संबंधित रस्त्याचे भूमिपूजन थाटामाटात करण्यात आले होते.
या रस्त्याला दोन महिन्यानंतर शेगाव बु -चंदनखेडा, मुधोली,मोहरली या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली या बांधकाम करणाऱ्या ठेकेदार यांनी एका बाजूने रस्त्याचे बांधकाम करत दुसऱ्या बाजूला वाहतूक सुरळीत ठेवणे अपेक्षित असताना पर्यायी व्यवस्था नसुन ठेकेदार यांनी संपूर्ण रस्ताच खोदून त्यावर माती,मुरूम टाकून काळी गिट्टी पसरवण्यात आली त्यामुळे परिसरात झालेल्या पावसात वाहने रस्त्यावरून चालताना चिखलामध्ये फसुन, घसरून किरकोळ अपघात होत आहे, तसेच परिणामी रस्त्या अभावी शेगाव बु मार्गे शेगाव खुर्द चंदनखेडा मुधोली ही बस सेवा मागील आठवडाभरापासून परिवहन विभागाकडून बंद करण्यात आली असून ही बस सेवा शेगाव, आष्टा,मार्गे मुधोली या मार्गे वळवण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार 30 जून पासून संपूर्ण विदर्भामध्ये शाळांचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असून 30 जून पासून एकदाही बस या मार्गे न गेल्यामुळे मुधोली, काटवल, विलोडा, कोकेवाडा, चंदनखेडा, शेगाव खुर्द,या ठिकाणाहून शेगाव बु.मध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना येण्यासाठी पर्याय उरलेला नाही. त्यामुळे मागील आठवडाभरापासून या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. तसेच संबंधित ठेकेदाराने लवकरात लवकर एका बाजूने वाहतूक सुरळीत कशी करण्यात येईल याकडे लक्ष देऊन पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!