SIR मोहिमेत मोठा यू-टर्न! शिक्षकांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
धाराशिवमध्ये SIR मोहिमेसाठी शिक्षकांना दिलासा; BLO सहाय्यक म्हणून शिक्षकांची नियुक्ती रद्द
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य; ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका आदींवर जबाबदारी
धाराशिव | प्रतिनिधी
भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना सहाय्य करण्यासाठी शिक्षकांची करण्यात आलेली नियुक्ती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तात्काळ रद्द केली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची शक्यता लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत मतदारांना Enumeration Form वाटप करणे, भरलेले अर्ज व आवश्यक कागदपत्रे स्वीकारणे, त्यांचे स्कॅनिंग करून ERO NET प्रणालीवर अपलोड करणे तसेच मतदारांना सूचना देणे अशी विविध कामे BLO मार्फत केली जाणार आहेत.
या कामासाठी सुरुवातीला शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यामुळे शाळांतील अध्यापनावर परिणाम होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने शिक्षकांना या जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय घेतला.
याऐवजी ग्रामीण भागात ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील, महसूल सेवक, अंगणवाडी सेविका, वीज वितरण कंपनीचे मीटर रीडर, पोस्टमन तसेच स्थानिक माहिती असलेले इतर शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांची BLO सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. शहरी भागातही उपलब्धतेनुसार इतर शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जारी केलेल्या या आदेशामुळे विशेष पुनरीक्षण मोहिमेचे काम सुरळीत सुरू ठेवतानाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाने समतोल भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!