विदर्भाच्या काशीतील जलशुद्धीकरण केंद्रात घाणीचे साम्राज्य; पवनीकरांच्या आरोग्याशी नगरपरिषदेचा जीवघेणा खेळ?
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या पवनी शहरातील दुर्गा माता मंदिर परिसरात असलेल्या नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण (वॉटर फिल्टर) केंद्रात प्रचंड अस्वच्छता, बंद अवस्थेतील यंत्रणा आणि दुर्लक्षित देखभाल यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शुद्ध पाणी पुरविण्याचा दावा करणाऱ्या या केंद्रातून नागरिकांना गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात झाडे-झुडपे, वाढलेले गवत, कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले असून, पाणी शुद्धीकरणाच्या टाक्या व फिल्टर परिसरात मच्छरांचा वावर असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी फिल्टर प्लांटच्या मोटारी बंद अवस्थेत असल्याचेही निदर्शनास आले. अशा परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणार कसे, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पवनी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे तसेच नगराध्यक्ष विजयाताई नंदुरकर आणि मुख्याधिकारी यांचे या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी नळाद्वारे गढूळ पाणी पुरवठा होत असून, भविष्यात जलजन्य व साथीच्या रोगांचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याच परिसरात शासनाच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेले शालेय विद्यार्थ्यांच्या व्यायामाचे साहित्य उघड्यावर पडून गंजत असल्याचेही दिसून आले आहे. कोट्यवधी रुपयांच्या शासकीय मालमत्तेची अशी होत असलेली नासाडी ही नगरपरिषदेच्या शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणाचे उदाहरण असल्याची टीका होत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, जलशुद्धीकरण केंद्रातील प्रयोगशाळा प्रत्यक्षात वापरात नसून केवळ कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीचे ठिकाण बनल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच जलशुद्धीकरण केंद्रातील साहित्य, यंत्रसामग्री व देखभालीबाबत माहिती विचारली असता मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणीस नकार देत मोबाईलवरून टाळाटाळ करणारी उत्तरे दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेल्या नव्या पदाधिकाऱ्यांनीही या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पवनीकरांनी जिल्हा प्रशासन, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जलशुद्धीकरण केंद्राची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच शहरवासीयांना त्वरित शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!