सावधान! वैनगंगा नदीकाठच्या नागरिकांसाठी प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

चिचडोह बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गोसीखुर्द धरणातून पाण्याचा वाढता विसर्ग; ४ जुलै रोजी सकाळी ८ वाजल्यापासून चिचडोह बॅरेजचे ७ दरवाजे उघडणार


चामोर्शी, दि. ३ जुलै : गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत असल्याने चिचडोह बॅरेजमधूनही पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. याबाबत पाटबंधारे उपविभाग, चामोर्शीचे उपविभागीय अभियंता यांनी तहसीलदारांना पत्राद्वारे माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोसीखुर्द धरणाच्या विद्युतगृहामधून सध्या ३५० क्यूमेक्स क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू असून, ३ जुलै रोजी दुपारी ३ वाजल्यापासून तो टप्प्याटप्प्याने वाढवून ३५० क्यूमेक्सवरून ५०० क्यूमेक्सपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे चिचडोह बॅरेजच्या पाणी साठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या बॅरेजची पाणीपातळी २८.४८० मीटर असून, पूर्ण जलसाठा पातळी (FRL) २८.६२५ मीटर आहे. ही पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ४ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून चिचडोह बॅरेजचे ७ दरवाजे प्रत्येकी ४५.६५ सेंटीमीटर उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, नदीपात्रात किंवा काठावर अनावश्यक वावर टाळण्याचे तसेच कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!