व्याहाड–सोनापूर मार्गावर हत्तीचा थरारक हल्ला - हल्यात सोनापूरच्या इसमाचा दुर्दैवी मृत्यू

सावली -सावली तालुक्यात रानटी हत्तींच्या वाढत्या वावराने आणखी एका नागरिकाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनापूर येथील अतुल गोहने हे दुचाकीने सोनापूरकडे जात असताना व्याहाड–सोनापूर मार्गावर त्यांच्या दुचाकीसमोर अचानक रानटी हत्ती आल्याचे सांगितले जात आहे. समोर हत्ती दिसताच त्यांनी प्रसंगावधान राखत दुचाकी रस्त्यावरच सोडली आणि जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, संतप्त हत्तीने त्यांचा पाठलाग करून हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या भीषण हल्ल्यात अतुल गोहने यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, या घटनेने संपूर्ण सावली तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे.

गेल्या अनेक आठवड्यांपासून सावली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा मुक्त संचार सुरू आहे. हत्तींकडून शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतानाच आता मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीही अनेक गावांमध्ये हत्तींचा वावर आढळून आला असून, नागरिकांमध्ये सतत भीतीचे वातावरण आहे.

या घटनेनंतर वनविभागाच्या उपाययोजनांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. हत्तींच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण, नागरिकांना वेळेवर इशारे आणि संवेदनशील भागात तातडीने सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी परिसरातून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!