वरोरा नगर परिषदेत सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक बैठक



अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन (रजि. क्र. २२६१), जिल्हा शाखा चंद्रपूर यांच्या वतीने नगर परिषद वरोरा येथे कार्यरत सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी दि. १ जुलै २०२६ रोजी नगर परिषद वरोरा येथील सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली.
ही बैठक महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. छगन महातो यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाध्यक्ष सुनील बळीराम महातव यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच संघटनेच्या शिष्टमंडळाच्या सहभागाने मुख्याधिकारी मा. सिद्धार्थ मेश्राम यांच्यासोबत सकारात्मक वातावरणात पार पडली.
बैठकीच्या प्रारंभी नगर परिषद वरोरा यांच्या वतीने मा. छगन महातो यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर जिल्हाध्यक्ष सुनील बळीराम महातव यांनी सफाई कामगारांच्या विविध समस्या मांडल्या. त्यावर मा. छगन महातो यांनी पुराव्यासह पुढील प्रमुख मागण्या सादर केल्या:
सन २००५ नंतर नियुक्त झालेल्या सफाई कामगारांच्या DCPS/NPS/UPS नव्या पेन्शन योजनेबाबत अंतिम निर्णय नसल्याने, सेवानिवृत्त व मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांकडून करण्यात आलेली बेकायदेशीर कपात ४% व्याजासह सात दिवसांत परत करण्याची मागणी करण्यात आली. यावर मुख्याधिकारी यांनी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून पात्र वारसांना सात दिवसांत ४% व्याजासह रक्कम परत करण्याचे निर्देश दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना अंतर्गत ५० सफाई कामगारांसाठी मोफत गृहनिर्माण योजनेचा DPR तयार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक आश्वासन देण्यात आले.
नझूल जागेवरील सफाई कामगारांच्या घरांना कायमस्वरूपी घरपट्टे वाटपाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
शिक्षित सफाई कामगारांना लिपिक व तांत्रिक पदांवर नियुक्ती देण्याची मागणी करण्यात आली.
शासकीय शौचालयांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना लेखी नियुक्ती आदेश, ओळखपत्र (I-Card), गणवेश तसेच आवश्यकतेनुसार पोलीस प्रशासनाची मदत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय इतर अनेक प्रलंबित प्रश्नांवरही सविस्तर चर्चा झाली. मुख्याधिकाऱ्यांनी अनेक मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने उपस्थित सफाई कामगारांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
बैठकीस गडचिरोली जिल्हाध्यक्ष सुभाष महानंदे, मूल तालुका अध्यक्ष संदीप पारचे, वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते गणेशजी बिरिया, शुभम कुडाबोर तसेच नगर परिषद वरोरा येथील महिला व पुरुष सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी उपस्थित कामगारांनी "अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन जिंदाबाद" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत संघटनेप्रती आपला दृढ विश्वास व्यक्त केला.
– सुनील बळीराम महातव
जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर
अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन (रजि. क्र. २२६१)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!