"नेते नाही, कुत्रे दिसले बॅनरवर... पण निशाणा मात्र कुणावर?"
"गावच्या गल्लीतील 'नेत्यांच्या' वाढदिवस संस्कृतीला गांधी चौकातून कुत्र्यांच्या बॅनरचा टोला!"
मूल : शहरातील गांधी चौक परिसरात सध्या लागलेल्या एका अनोख्या बॅनरने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या या बॅनरवर कोणत्याही नेत्याचा फोटो नसून चक्क कुत्र्यांचे चित्र वापरून उपरोधिक संदेश देण्यात आला आहे.
गावातील काही लहान-मोठे कार्यकर्ते वाढदिवसाच्या निमित्ताने चौकाचौकात मोठमोठे बॅनर लावून स्वतःला मोठे नेते म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करतात. याच प्रवृत्तीवर अप्रत्यक्ष भाष्य करणारा हा बॅनर असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
"अपरिचितांवर भुंकणारा, अनेकांना धाकवणारा, शेवटी काळजी घेणारा, घराचा रक्षणदार, कुत्र्यांचा आवडता..." अशा शब्दरचनेतून तयार करण्यात आलेल्या या जाहिरातीने राजकीय दिखाव्याच्या संस्कृतीवर मिश्कील भाष्य केले आहे.
विशेष म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागातील गांधी चौकात हा बॅनर लागल्याने त्याची चर्चा अधिक रंगली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या नावाखाली होणारी बॅनरबाजी आणि स्वतःच्या प्रसिद्धीचा अट्टहास यावर हा एक प्रकारचा "बॅनरमधून दिलेला बिनधास्त संदेश" मानला जात आहे.
"नेता होण्यासाठी फक्त बॅनर पुरेसे नसतात, कामही करावे लागते" — असा मूक संदेश या उपरोधिक बॅनरमधून दिला जात असल्याची चर्चा आहे.



शुभेच्छुक - शेरु,मोती,प्लुटो,टायगर, सिंबा,राजा,टफी, लकी
उत्तर द्याहटवा