विजय कोरेवार यांना मारण्याची धमकी - सावली पोलीसात तक्रार दाखल
विजय कोरेवार यांना मारण्याची धमकी - सावली पोलीसात तक्रार दाखल
सावली : राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले माजी सभापती विजय कोरेवार यांना मारण्याची धमकी दिल्याने रोहीत बोम्मावार यांचेविरोधात सावली पोलीस पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देऊन संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
विजय कोरेवार यांच्या तक्रारीनुसार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांचे पुतणे नरेंद्र राचेवार हे सीडीसीसी बँकेच्या सावली शाखेत गेले होते. त्यावेळी बँकेचे संचालक रोहित बोम्मावार यांनी त्यांना केबिनमध्ये बोलावून विजय कोरेवार यांना समजावून सांगण्यास सांगितले. तसेच, आपल्याविरोधात विविध गावांमध्ये बोलले जात असल्याचा आणि न्यूज पोर्टलवर बातम्या प्रसिद्ध केल्या जात असल्याचा उल्लेख करत, यापुढे स्टेजवर जाऊन मारहाण करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेच्या वेळी आपण गावाबाहेर असल्याने पुतण्याने फोनवरून या प्रकाराची माहिती दिली, असे कोरेवार यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच, पूर्वी खेडी येथे एका व्यक्तीला मारहाण करून दहशत निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या धमकीमुळे आपल्या जीवितास धोका निर्माण झाला असून, संबंधित व्यक्तीकडून स्वतः किंवा इतरांमार्फत इजा पोहोचविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तक्रार विजय कोरेवार यांनी सावली पोलीस स्टेशनला केली आहे. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन गोहणे, शहर काँग्रेस अध्यक्ष क्रिष्णा राऊत, बाजार समितीचे संचालक निखिल सुरमवार, नगरसेवक गुणवंत सुरमवार, आशिष मनबतुलवार, नितीन दुवावार, प्रविण गेडाम, विकास पुपरेड्डीवार, रुपेश किरमे, पंकज सुरमवार, अनिल बद्दमवार, भास्कर आकारपवार, नरेंद्र राचेवार, राजू कंचावार, दिनेश रामिडवार, हिराचंद कुळमेथे, नागेश ओगुवार, संजय मर्लावार, रामदास मर्लावार आदी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कारवाईची मागणी केली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!