चार महिन्यांपासून शेगाव–चंदनखेडा रस्त्याचे काम ठप्प; नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू!

संपूर्ण रस्त्यावर काळी गिट्टी पसरवून ठेकेदार गायब; धुळीचा त्रास, किरकोळ अपघातांत वाढ – रस्त्यावर उभा असलेला रोलरही ठरतोय अपघाताला निमंत्रण

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव बु. ते भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा या सुमारे १२ किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मागील चार महिन्यांपासून रखडले असून, संबंधित कंत्राटदाराच्या कामकाजामुळे परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे काम अर्धवट सोडून संपूर्ण मार्गावर काळी गिट्टी पसरविण्यात आल्याने हा रस्ता सध्या वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. दररोज किरकोळ अपघात घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शेगाव बु. येथून चंदनखेडाकडे जाणाऱ्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खोदकाम करून जुलै महिन्यात पावसाळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणात काळी गिट्टी पसरविण्यात आली. मात्र, त्यानंतर रस्त्याचे पुढील काम अपेक्षित गतीने झालेले नाही. परिणामी, वाहनधारकांना खड्डेमय आणि गिट्टीने भरलेल्या रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दुचाकी चालविताना वाहन घसरून पडण्याची भीती असून, अनेक वाहनांना पंक्चर होण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे.

धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

या रस्त्यावरून दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्यावर पसरलेल्या गिट्टीमुळे आणि धुळीमुळे वाहन गेल्यानंतर प्रचंड धुरळा उडतो. ही धूळ वाहनचालकांच्या डोळ्यांत, नाकात आणि तोंडात जात असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या धुळीचा सर्वाधिक फटका बसत आहे. रस्त्यालगत असलेल्या शेतातील पिकांवरही धुळीचे थर साचत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

इंधन खर्चासह वाहनांच्या देखभालीचा आर्थिक भुर्दंड

शेगाव हे परिसरातील ५० ते ६० गावांसाठी महत्त्वाचे केंद्रस्थान आहे. या मार्गावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच रुग्णांची वाहतूक सुरू असते. रस्त्याची दुरवस्था झाल्याने दुचाकीस्वारांना पहिल्या-दुसऱ्या गिअरमध्ये वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे इंधनाचा अतिरिक्त खर्च वाढत असून, वाहनांच्या दुरुस्ती व देखभालीवरही अधिक पैसे खर्च करावे लागत आहेत. आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांवर हा अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

रस्त्यावर उभा असलेला रोलर अपघाताला निमंत्रण!
या मार्गावर बांधकामासाठी वापरण्यात येणारा रोलर मागील अनेक दिवसांपासून रस्त्यावरच उभा आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी वाहनधारकांना सहज लक्षात येईल अशा प्रकारची कोणतीही पुरेशी सुरक्षा व्यवस्था, सूचना फलक किंवा प्रतिबंधक चिन्हे लावण्यात आल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे रात्रीच्या अंधारात या रोलरला वाहन धडकून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित यंत्रणा एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे काय, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

रुग्णवाहिका व रुग्णांनाही प्रवासाचा त्रास

शेगाव हे ५० ते ६० गावांचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने परिसरातील नागरिक उपचारासाठी येथे येतात. विशेषतः रात्रीच्या वेळी गंभीर आजारी रुग्णांना दवाखान्यात आणताना या खराब रस्त्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होतात. रुग्णवाहिकांनाही या मार्गावरून जाताना अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.

उद्घाटनावेळी लोकप्रतिनिधींची उपस्थिती; आता लक्ष देणार कोण?

या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, चंद्रपूर-वणी-आर्वी क्षेत्राचे खासदार तसेच वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, उद्घाटनानंतर अवघ्या काही महिन्यांतच या महत्त्वाच्या रस्त्याचे काम चार महिन्यांपासून रखडल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात समन्वयाचा अभाव आहे काय? काम रखडण्यामागचे नेमके कारण काय? काम पूर्ण करण्यासाठी निश्चित केलेली कालमर्यादा काय होती? तसेच कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था का करण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी

संबंधित बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामाच्या सद्यस्थितीचा अहवाल घ्यावा. काम रखडण्याची कारणे तपासून संबंधित कंत्राटदाराला नियमानुसार नोटीस बजावावी. कामात निष्काळजीपणा किंवा करारातील अटींचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी. तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या रोलरची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करून तातडीने सूचना फलक, रिफ्लेक्टर आणि बॅरिकेड्स लावावेत. रस्त्यावर नियमित पाणी फवारणी करून धुळीचा त्रास कमी करावा आणि रखडलेले बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

आता तरी संबंधित विभागाला जाग येणार का? की एखाद्या मोठ्या अपघातानंतरच प्रशासन कारवाई करणार? असा संतप्त सवाल शेगाव ते चंदनखेडा मार्गावरील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!