जिन्यावरून तोल जाऊन पडल्याने वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू!
पावसापासून कापूस झाकण्यासाठी गेले असताना काळाचा घाला; कुटुंबावर शोककळा
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव परिसरातील मेसा येथे जिन्यावरून खाली उतरत असताना अचानक तोल जाऊन पडल्याने शामराव मारोती मेश्राम (वय ६० वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मेसा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, शामराव मेश्राम यांनी आपल्या शेतातील कापूस घरी आणला होता. मात्र, घरामध्ये कापूस ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने त्यांनी तो कापूस दुसऱ्याच्या घरावर ठेवला होता. बुधवारी रात्री अचानक पाऊस सुरू झाल्याने ठेवलेला कापूस भिजू नये, यासाठी ते कापूस झाकण्याकरिता गेले होते.
कापूस झाकल्यानंतर जिन्यावरून खाली उतरत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. घटनेनंतर त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची चंद्रपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. आज सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शामराव मेश्राम यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने मेश्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!