मूलमध्ये दुर्गा विसर्जनात डीजेचा दणदणाट; "परमेश्वरी"सह दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल!

मूलमध्ये दुर्गा विसर्जनात डीजेचा दणदणाट; दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल!

निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजविल्याने पोलिसांची कारवाई; ९४ लाख ५० हजार रुपयांचे डीजे साहित्य व वाहने जप्त


मूल | पब्लिक पंचनामा

मूल शहरात २४ ऑक्टोबर २०२६ रोजी शारदा व दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजविल्याप्रकरणी मूल पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत सहा डीजे साउंड सिस्टीमसह सहा वाहने जप्त करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ९४ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती मूल पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात मूल शहरातील चर्चित परमेश्वरी दुर्गा मंडळ यांचे वरही कारवाई करण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गादेवी विसर्जन बंदोबस्ताच्या अनुषंगाने चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या निर्देशांनुसार मूल शहरात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. विसर्जन मिरवणुकीदरम्यान महात्मा फुले चौक ते गांधी चौक या परिसरात काही डीजे निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात वाजविले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित डीजे चालक व मालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २२३ सहकलम ३८ अंतर्गत तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३६ अंतर्गत चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दहा जणांविरुद्ध कारवाई

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये प्रवीण मुर्लीधर खानोरकर (वय ४५), पंकज गणपत नैताम (वय ३५), उमेश महादेवजी हुंडे (वय ३५), रोहित विजय झुमडे (वय ३०), वैशाली सचिन घोगरे (वय ३५), यश विश्वास बोलिवार (वय ३०), पुष्पलाबाई विष्णू बालकोंडे (वय ६३), सुजित शरद रेड्डीवार (वय ३६), नंदनी गणेश रामशेट्टीवार (वय ३५) आणि मनीष अशोक खोब्रागडे (वय २५) यांचा समावेश आहे. हे सर्व मूल व परिसरातील रहिवासी असल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे.

सहा वाहने आणि डीजे साहित्य जप्त

कारवाईदरम्यान डीजे साउंड सिस्टीम, बेस, टॉप स्पीकर्स, मिक्सर, जनरेटर आणि इतर संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. यासाठी वापरण्यात आलेली सहा वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली. जप्त डीजे साहित्याची किंमत ३० लाख ४५ हजार रुपये, तर वाहनांची किंमत ६४ लाख रुपये असल्याचे प्रसिद्धिपत्रकातील तक्त्यात नमूद आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर काटकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय राठोड व मूल पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदारांनी ही कारवाई केली.

सार्वजनिक उत्सव व मिरवणुकांच्या काळात ध्वनिप्रदूषणास प्रतिबंध करणे, सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे. नागरिकांनी ध्वनिक्षेपक व डीजेचा वापर करताना निर्धारित नियमांचे पालन करावे, असे आवाहन मूल पोलिसांकडून करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!