नगराध्यक्ष एकता समर्थ आणि बांधकाम सभापती प्रशांत समर्थ आक्रमक; गांधी चौकात बेमुदत उपोषणाचा इशारा
मूलच्या दुर्गोत्सव विसर्जनावरून राजकीय संघर्ष पेटला!
नगराध्यक्ष एकता समर्थ आणि बांधकाम सभापती प्रशांत समर्थ आक्रमक; गांधी चौकात बेमुदत उपोषणाचा इशारा
मूल : मूल शहरातील दुर्गादेवी व शारदा देवीच्या एकूण आठ मंडळांचे विसर्जन काल पार पडले. मात्र, यापैकी केवळ दरार दुर्गा मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या चार डीजे धारकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने शहरात राजकीय वातावरण तापले आहे. या कारवाईवरून नगराध्यक्ष एकता समर्थ आणि बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राजकीय दबावातून ही कारवाई करण्यात आल्याने, ही कारवाई मागे न घेतल्यास आपण उद्यापासून (दिनांक 23 ऑक्टोबर) गांधी चौकात डेमोदत उपोषण करणार असल्याचा इशारा नगराध्यक्ष एकता समर्थ आणि बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी दिल्याने, शहरात प्रचंड खळबळ माजली आहे
कारवाईत दुजाभाव झाल्याचा आरोप!
शहरातील आठ मंडळांचे विसर्जन होत असताना केवळ एका मंडळाच्या मिरवणुकीतील चार डीजे धारकांवरच गुन्हे दाखल करण्यात आल्याने ही कारवाई राजकीय हेतूने आणि राजकीय दबावातून करण्यात आल्याचा आरोप समर्थ दाम्पत्याने केला आहे. या कारवाईमागील नेमके कारण काय, इतर मंडळांच्या बाबतीत कोणती भूमिका घेण्यात आली आणि कायद्याची अंमलबजावणी सर्वांसाठी समान आहे का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
गांधी चौकात बेमुदत उपोषणाचा इशारा!
पोलिसांच्या या कारवाईविरोधात नगराध्यक्ष एकता समर्थ आणि बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी दुर्गा मंडळाच्या सदस्यांसह गांधी चौकात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हा विषय केवळ विसर्जन मिरवणुकीपुरता मर्यादित न राहता आता राजकीय संघर्षाच्या दिशेने जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
नगरपरिषदेतील सत्तास्थानी असलेल्या समर्थ दाम्पत्यानेच या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिस प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे शहरातील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
विसर्जन बाकी असताना संघर्षाची ठिणगी!
मूल शहरातील काही मंडळांचे विसर्जन अद्याप बाकी असताना हा वाद उफाळून आल्याने आगामी विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती कशी हाताळली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समर्थ दाम्पत्याच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पोलिस प्रशासन कोणती भूमिका घेते, हा या प्रकरणातील महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे.
आता हा वाद केवळ डीजेवरील गुन्ह्यांपुरता मर्यादित राहणार, की मूलच्या राजकारणात नव्या संघर्षाला तोंड फुटणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!